एक-दोन दिवस अर्थात अल्पमुदतीच्या प्रवासासाठी कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक सरकारने आरटीपीसीआर सर्टिफिकेट चा सक्तीतून वगळले आहे. अशा व्यक्तींनी आपल्या दोन वेळा लसीकरण झाले असल्याचे प्रमाणपत्र दाखवावे, तसेच थर्मल स्कॅनिंग व इतर चाचण्यांना सामोरे जावे. मात्र आपल्या परतीचे तिकीट घेऊनच यावे असे आवाहन कर्नाटकाच्या आरोग्य विभागाने केले आहे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमा रेषेवर राहणाऱ्या अनेक नागरिकांना नोकरी व्यवसाय व इतर अनेक कारणांसाठी कर्नाटकात वारंवार यावे लागते. अशा व्यक्तींना प्रत्येक वेळी आरटीपीसीआरची सक्ती करता येत नाही. लग्नसमारंभ किंवा पाहुणे मंडळींच्या भेटी कार्यक्रमांसाठी येणाऱ्या व्यक्तींना हि दरवेळी आरटीपीसीआर करून येणे महागडे ठरते. त्यामुळे अशा अल्पमुदतीच्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे.
मात्र आपण अल्पमुदतीचे प्रवासी आहोत .हे सिद्ध करण्यासाठी संबंधितांना परतीचे तिकीट किंवा आपण कशासाठी आलो आणि कधी जाणार हे सिद्ध करून दाखवावे लागणार आहे.
कोविड संदर्भात कर्नाटक सरकारने एक बैठक घेऊन निर्णय घेतला असून आठ नोव्हेंबरला एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार सीमारेषेवर तपासणी करणाऱ्या सर्व नाक्यांना सूचना देण्यात आली असून अल्पमुदतीच्या प्रवाशांवर या प्रकारची सक्ती करू नका .असे आदेश देण्यात आले आहेत.
कोविडची परिस्थिती सुधारत आहे. बस रेल्वे विमान यासारखा प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे .अशा वेळी अल्प मुदतीसाठी येणाऱ्यावर बंधन असू नये असा विचार कर्नाटक सरकारने केला असून त्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे.