कर्नाटक राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या 25 जागांसाठी तीनही प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवार निवड प्रक्रियेमध्ये कर्नाटकात राजकीय वर्चस्व असणाऱ्या लिंगायत आणि वक्कलिग या समाजाचे प्रभुत्व दिसून आले आहे. पक्षाच्या तिकीट वाटपामध्ये 60 टक्क्यांहून अधिक तिकिटांवर या दोन्ही समाजांनी संयुक्तरित्या अधिकार गाजविला आहे. या व्यतिरिक्त एक अनुसूचित जाती आणि दोन अनुसूचित जमातीचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
एकीकडे लिंगायत समाजाने उत्तर कर्नाटकातील कृष्णा खोऱ्यातील राजकीय क्षेत्र काबीज केले असताना दुसरीकडे दक्षिण कर्नाटकातील कावेरी खोऱ्यामध्ये वक्कलिगांनी वर्चस्व राखले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, विरोधी पक्ष काँग्रेस आणि निधर्मी जनता दलाच्या उमेदवार निवडीवरून हे स्पष्ट झाले आहे. कारवारसह संपूर्ण उत्तर कर्नाटकात भारतीय जनता पक्ष एकूण 8 जागा लढवत असून त्यापैकी 7 जागा लिंगायत समाजाच्या आहेत. यावरून भाजपची ‘होट बँक’ असणाऱ्या या समाजाचा पक्षातील प्रभाव दिसून येतो. कारवार मतदारसंघातील गणपती उळवेकर हे उत्तर कर्नाटकातील एकमेव बिगर लिंगायत उमेदवार असून ते इतर मागासवर्गीय आहेत.
मंगळूर आणि उडपीसह दक्षिण कर्नाटकातील सर्व पक्षांमध्ये वक्कलिग उमेदवारांची संख्या जास्त आहे. भाजपने वक्कलिग समाजाचे 6 उमेदवार आणि लिंगायत समाजाचे 2 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. त्याचप्रमाणे उर्वरित 4 जागांसाठी दोन इतर मागासवर्गीय आणि आर्य वैश्य व खोडवा समाजाचा प्रत्येकी एक उमेदवार त्यांनी दिला आहे.
दरम्यान, अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांनी आपल्यावर येणारा दबाव झुगारून उमेदवारी मागे घेण्यास नकार दिल्यामुळे विधानपरिषदेच्या बेळगाव मतदारसंघातील निवडणूक वातावरण तापले आहे. समर्थकांच्या मते लखन जारकीहोळी यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी भाजप नेत्यांसह कांही काँग्रेस नेत्यांनीही दबाव आणला होता. ‘आपली मते पडतील अशी भीती या सर्वांना वाटत आहे’, असे जारकीहोळी यांचे समर्थक मल्लाप्पा उडचण यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जारकीहोळी कुटुंबातील एका सदस्याने लखन जारकीहोळी यांची उमेदवारी गोकाकचे जिल्ह्याच्या राजकारणातील भवितव्य ठरवण्यासाठी आणि उत्तर कर्नाटकात राजकीय वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या लिंगायत समाजाला शह देण्यासाठी अशा दोन कारणांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे भाजप नेतृत्वाला सांगितले आहे. याखेरीज भाजप नेतृत्व मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर रमेश जारकीहोळी यांना म्हणावा तसा पाठिंबा देऊन त्याच्या पाठीशी उभे राहत नसल्याचा जारकीहोळी परिवाराचा समज झाला असल्याचेही निदर्शनास आले आहे, असे त्या सदस्याने स्पष्ट केले.