विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची पहिली प्राथमिक यादी घोषित करण्यात आली आहे. मात्र काँग्रेसच्या पातळीवर अद्याप सामसुम असून 14 नोव्हेंबरनंतर काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यातील 25 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून निवडणुकीची जोमाने तयारी सुरू केली आहे. यासाठी उमेदवारांच्या चाचपणीलाही सुरुवात झाली आहे. भाजपकडून पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली असून त्यात महांतेश कवटगीमठ यांचा समावेश आहे. यामुळे काँग्रेसच्या उमेदवार यादीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. याशिवाय काँग्रेसकडे आठ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्या आठ जणांपैकी एकाला उमेदवारी दिली जाणार की दुसऱ्याच चेहराला उमेदवारी मिळणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.
उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार भाजपने मंगळूर मतदारसंघातून कोटा श्रीनिवास पुजारी, गुलबर्ग्यातून बी. जी. पाटील, धारवाड जिल्ह्यातून प्रदीप शेट्टर, चिक्कमंगळूरमधून एम. के. प्राणेश, कोडगुतून सुनील सुब्रमणी तर बेळगाव जिल्ह्यातून महांतेश कवटगीमठ यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. दरम्यान, अंतिम यादी अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही उमेदवारांच्या घोषणेबाबत भाजपने आघाडी घेतली असली तरी काँग्रेस पक्षाकडून चर्चा आणि बैठकीचे नियोजन केले जात आहे.
काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केलेल्यांमध्ये माजी आमदार श्याम घाटगे, चन्नराज हट्टीहोळी आदींसह अन्य इच्छुकांचा समावेश आहे. सदर उमेदवारी अर्जावर चर्चा करण्यासाठी येत्या 14 नोव्हेंबरला बैठक आयोजित केली असून त्यातील निर्णयाचा प्रस्ताव हायकमांडला पाठविला जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.