विधान परिषद निवडणुकीच्या प्रक्रियांमुळे बेळगावात होणारे हिवाळी अधिवेशन आता लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या संदर्भातील निर्णय कर्नाटक सरकारच घेणार असून तो योग्य वेळी जाहीर केला जाईल. अशी माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ एम जी हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम त्यांनी जाहीर केला. विधान परिषद निवडणुकीच्या दोन जागा बेळगाव जिल्ह्यात येतात. त्यामुळे त्या संदर्भातील एकंदर तयारी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली .
16 डिसेंबर पर्यंत या निवडणुकीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे विधानसभा अधिवेशन बेळगावात घेण्याच्या तारखेत बदल होऊ शकतो. डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यात विधानसभा अधिवेशन घेण्याचा सरकारचा निर्णय होता .
15 तारखे पूर्वीची तारीख जाहीर करून विधानसभा अधिवेशन घेतले जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र निवडणूक होईपर्यंत विधानपरिषद सदस्य या अधिवेशनाला मुकणार असल्यामुळे नवीन 25 सदस्य निवडून आल्यानंतरच विधान सभेचे हिवाळी अधिवेशन घेतले जाणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात खुली चर्चा केली नसली तरी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अधिवेशनाच्या तारखे संदर्भातील निर्णय सरकारच घेईल .असे स्पष्ट केले आहे.