गाव वसण्यासाठी गाव चालत राहण्यासाठी शेकडो हात राबत रहातात.महाराष्ट्राचे प्रसिद्ध लेखक आणि लोक शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात ‘ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकऱ्यांच्या हातावर तरली आहे’. आणि हाच धागा पकडत बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील बाजारात ज्या वृद्ध महिला स्वतःच्या कष्टावर जीवन जगत आहेत अश्या कष्टकरी महिलांच्या आयुष्यात दिवाळी सण अधिक दिपमय करण्याचा प्रयत्न केला आहे.
मिशन स्प्रेडिंगस स्माईल घेऊन कार्य करणाऱ्या किरण निपाणीकर,संतोष दरेकर, कपिल शिवलकर आणि गोपाळ धोंगडी यांनी रेम्बो साडीजच्या मदतीने गेल्या दोन दिवसांत शहर आणि शहापूर वडगांव बाजारात भाजी फुले आणि दिवे विक्री करून स्वाभिमानाने उदर निर्वाह करणाऱ्या आजींना सिल्क साडीची दिवाळी भेट दिली आहे.
बेळगाव शहरातील भावे चौक,कंबळी खुट, समादेवी गल्ली, शहापूर वडगांव मार्केट मधील 80 वृद्ध महिलांना सिल्क साडीची दिवाळी भेट दिली आहे.कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू पुरवणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे त्या निमित्ताने थोडे का होईना आपण ऋणातून उतराई होते.
या सामाजिक उपक्रमांसाठी बेळगाव लेडीज क्लबच्या अध्यक्षा प्रादेशिक आयुक्त आदित्य आम्लान बिस्वास यांच्या पत्नी मैत्रियी बिश्वास आणि जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांच्या पत्नी तनुजा हिरेमठ यांची उपस्थिती होती.
गाव सुखी असावं या संकल्पनेतून मिशन स्प्रेडिंगस स्माईलस (चेहऱ्यावर हसू पसरवण्याचे लक्ष) घेऊन काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या उपक्रमाचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.रस्त्यावर उन्हा पावसात राबणाऱ्या मेहनती हाताचे व्यथा वेदना संवेदना जिल्हाधिकारी व प्रादेशिक आयुक्त यांच्या पर्यंत पोचवण्याचे कार्य त्यांच्या पत्नी मार्फत होईल असा आशावाद कष्टकरी महिलातून व्यक्त झाला.