बेळगावात डिसेंबर महिन्यात होणारे हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व सिद्धता करण्यात यावी. निवास, जेवणखाण आणि वाहतुकीसह अन्य व्यवस्था वेळेवर योग्य रीतीने हाताळली जावी, अशी सक्त सूचना ग्रामीण अभिवृद्धी पंचायत राज्य खात्याचे मुख्य कार्यदर्शी आणि जिल्हा पालक सचिव एल. के. अतिक यांनी आज केली.
राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहामध्ये आयोजित पूर्वतयारीचा आढावा बैठकीमध्ये ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. अधिवेशनात सहभागी होणारे मंत्रीगण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी शिष्टाचारानुसार निवास आणि वाहनांची सोय केली जावी. सुवर्ण गार्डन आणि इतर ठिकाणच्या आंदोलन व निदर्शन स्थळी योग्य बंदोबस्त ठेवून खबरदारी घेतली जावी. सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा, पिण्याचे पाणी, शौचालय आदी मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिल्या जाव्यात. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी पोलीस खात्याने पूर्व खबरदारी घ्यावी, अशा सूचना अतिक यांनी बैठकीत दिल्या.
प्रेक्षक गॅलरीतील सार्वजनिकांची हजेरी आणि कोरोना मार्गदर्शक सूचीचे पालन यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगून सुवर्ण विधानसौध इमारतीमधील पिण्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी करण्याबरोबरच पाण्याच्या टाक्या व्यवस्थित धुऊन स्वच्छ कराव्यात. बेंगलोर विधानसभेप्रमाणे काॅम्प्युटरसह आवश्यक सर्व यंत्रसामुग्री मागून सुवर्ण विधानसौधमध्ये देखील ई -ऑफिस सुविधा उपलब्ध करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
अधिवेशन सुरळीत पार पडावे यासाठी सर्व ती सिद्धता करण्यात येत आहे. वाहतूक, निवास आणि भोजन व्यवस्थेसाठी समित्या नेमण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी दिली. त्याचप्रमाणे यावेळी तक्रार निवारण समिती स्थापण्यात आली असून त्याद्वारे तक्रारी व समस्यांचे तात्काळ निवारण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
अधिवेशन काळातील बंदोबस्त आणि रहदारी नियंत्रणासाठी 5 हजारांहून अधिक पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. या सर्वांची निवास आणि जेवण खाण्याची योग्य प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्नेहा पी. व्ही. यांनी दिली.
अधिवेशनाचे विशेष अधिकारी असणारे हुबळी-धारवाड महापालिकेचे आयुक्त डाॅ. सुरेश इटनाळ यांनी मुख्यमंत्री, सभाध्यक्ष, सभापती, मंत्रीगण, आमदार, सर्व गणमान्य व्यक्ती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची शिष्टाचारानुसार निवास, जेवणखाण आणि वाहतुकीची सोय करण्यात आली असल्याचे सांगितले. जेवणखाण अर्थात भोजन समितीचे अध्यक्ष काडाचे प्रशासक शशिधर कुरेर आणि निवास व्यवस्था पाहणाऱ्या समितीचे अध्यक्ष मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदारीसंदर्भातील पूर्व तयारीची माहिती दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., अप्पर जिल्हाधिकारी शंकरांना वनक्याळ, अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी, उपविभागीय अधिकारी रवींद्र कर्लिंगनावर, अप्पर प्रादेशिक आयुक्त गीता कलगी, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मुख्य संचालक सी. बी. कोडली आदींसह संबंधित सर्व अधिकारी बैठकीस उपस्थित होते.