वीज कोसळल्यामुळे घरोघरी असलेले जवळपास 50 टीव्ही संच, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाईल आदी जळाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज सकाळी विजयनगर पाईपलाईन रोड परिसरात घडली.
बेळगाव शहर परिसरात आज सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मुसळधार पावसाबरोबरच विजाही कडाडत होत्या. पाईपलाईन रोड विजयनगर भागात आज सकाळी वीज कोसळली.
सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्या घराच्या मागील भागात कोसळलेल्या या विजेचा प्रवाह विद्युत तारांसह केबलमध्ये शिरल्यामुळे विजयनगर पाईपलाईन रोड परिसरातील घरोघरी असलेले जवळपास 50 टीव्ही संच जळाले.
त्याचप्रमाणे फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाईल, मोबाईल चार्जर आदी इलेक्ट्रॉनिक साहित्यही जळून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकट्या सुरेंद्र अनगोळकर यांच्या घरातील टीव्ही जळाल्यामुळे त्यांना सुमारे 60 हजाराचा फटका बसला आहे. हे नुकसान पाहता एकंदर या परिसरात वीज कोसळल्यामुळे लाखो रुपयांची हानी झाली आहे.
वीज कोसळून झालेल्या या नुकसानीमुळे नागरिक हवालदिल झाले असून त्यांच्यावर नव्याने संबंधित इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी करण्याची वेळ आली आहे. गैरसोय होऊ नये म्हणून बऱ्याच जणांनी आजच्या आज बाजारात जाऊन संबंधित साहित्य खरेदी करून घरी आणले.