खानापूर येथे आंतरधर्मीय प्रेमप्रकरणातून सुपारी देऊन खून झालेल्या अरबाज आफताब मुल्ला या तरुणाच्या मृतदेहांची डीएनए चांचणी केली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयाच्या परवानगीने कबरीतून मृतदेह बाहेर काढून केस व इतर नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले.
मयत अरबाज आफताब मुल्ला (वय 24, मूळ रा. बाहेर गल्ली खानापूर, सध्या रा. अझमनगर बेळगांव) याचे नातेवाईक आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी 5 च्या सुमारास दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. डीएनए चांचणीसाठी आवश्यक असलेले केस व अन्य घटकांचे संकलन करण्यात आल्यानंतर मृतदेह पुन्हा दफन करण्यात आला.
अरबाज खून प्रकरणामुळे राष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाल्याने पोलिसांकडून चौफेर पुरेशी दक्षता घेऊन या प्रकरणाचा तपास केला जात आहे. तपासात कोणतीही त्रुटी राहू नये. ज्यामुळे खून प्रकरणातील अटकेत असलेल्या संशयितांवर आरोप सिद्ध करणे सुलभ जाईल यादृष्टीने पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी तपासाची प्रक्रिया राबविली जात आहे.
अरबाज मुल्ला खून प्रकरण संवेदनशील असल्यामुळे शुक्रवारी अतिशय गोपनीयता बाळगून दफन केलेला मृतदेह बाहेर काढून नमुने घेण्यात आले. खानापूरनजीक रेल्वेमार्गावर धड, डोके आणि दोन पाय अशा चार तुकड्यात अरबाजचा मृतदेह आढळून आला होता. अशा प्रकरणात मृतदेहाचे अवशेष एकाच व्यक्तीचे असल्याचे सिद्ध करण्यासाठी डीएनए चांचणीचा आधार घेतला जातो.