गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडलेले असताना आता ग्रामीण भागातील सरकारी स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानातून ग्रामीण लोकांच्या सोयीसाठी उपलब्ध होणारे रॉकेलही गेल्या दोन महिन्यापासून बंद झाल्यामुळे गावकऱ्यांची विशेष करून महिलावर्गाची मोठी गैरसोय होत आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामीण भागातील रेशन वितरण केंद्रामधून रॉकेलचा पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांचे विशेष करून महिलांचे हाल होत आहेत. सिलिंडर ग्ँसचे दर गगनाला भिडल्याने स्वयंपाकासाठी महिलांना पुन्हा चुलीला फुंकर मारली लागत आहे. मात्र दोन महिन्यांपासून रॉकेलचा तुटवडा निर्माण झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. ग्रामीण भागात स्वयंपाक तसेच अंघोळसाठी पाणी तापवण्यासाठी रॉकेलची गरज भासते. मात्र आता रॉकेल वितरण बंद झाल्यामुळे लोकांची मोठी होत आहे.
ग्रामीण भागात अलीकडे कांही वर्षात बऱ्याच घरांमध्ये गॅसच्या शेगड्या आल्या आहेत. तथापी गॅस असला तरी चुलीचा वापर केला जातो. कारण भाकरी -भाजी सारखे काही पारंपरिक अन्न पदार्थ चुलीवरच तयार केल्यास अधिक रुचकर लागतात. परिणामी ग्रामीण भागात घरोघरी अद्यापही चुली अस्तित्वात आहेत. त्याचप्रमाणे अंघोळीचे पाणी देखील घरामध्ये अथवा परसात असलेल्या मोठ्या स्वतंत्र चुलीवर डेरा अथवा हंड्यात तापविण्याची परंपरा अजूनही ग्रामीण भागात आहे.
मात्र चुली पेटविण्यासाठी सुरुवातीला रॉकेलची आवश्यकताही भासतेच. यासाठी रेशन वितरण केंद्रातून प्रत्येक रेशन कार्डवर मिळणारे एक लिटर रॉकेल उपयोगी ठरते होते. मात्र आता गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत आणि जेवणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.
या परिस्थितीत गेल्या दोन महिन्यापासून अचानक रेशनवर प्रत्येक कार्डामागे 1 लिटर याप्रमाणे मिळणारे रॉकेल बंद झाले आहे. त्यामुळे ज्यादा भुर्दंड सोसून सर्वांना चूल पेटविण्यासाठी नाईलाजाने डिझेल खरेदी करावे लागत आहे. तरी पूर्वीप्रमाणे प्रत्येक शिधापत्रिकेवर किमान 1 लिटर रॉकेलचा पुरवठा करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.