कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले की, राज्यात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा लागू होणार आहे. पत्रकारांशी बोलताना बोम्मई म्हणाले, “राज्य सरकार इतर राज्यांनी लागू केलेल्या संबंधित कायद्यांचा अभ्यास करत आहे आणि लवकरच धर्मांतर विरोधी कायदा तयार केला जाईल.”
धर्मांतरावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या गटाच्या भेटीबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. हिंदू जनजागृती समितीचे निमंत्रक मोहन गौडा यांच्या नेतृत्वाखाली हा भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विविध हिंदू धार्मिक संघटनांचे 50 हून अधिक सदस्य यावेळी बोम्मई यांच्याकडे उपस्थित होते. धर्मांतरावर बंदी घालणारा कायदा बनवण्याच्या गरजेवर या मान्यवरांनी भर दिला.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की राज्यघटना जबरदस्तीने धर्मांतराला परवानगी देत नाही, प्रलोभन दाखवून धर्मांतर हा सुद्धा गुन्हा आहे.
श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक, संतोष गुरुजी, सिद्धलिंग स्वामी आणि प्रणवानंद स्वामी आदींनीही धर्मांतरास विरोध करणारा कायदा लवकरात लवकर मंजूर करण्याची मागणी केली आहे.
मुतालिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान बोलताना, शाळा आणि रुग्णालयांचा वापर धर्मांतरासाठी केला जात आहे. राज्यात अनेक बेकायदेशीर चर्चही उदयास येत असल्याचे सांगितले आहे.
धर्मांतरितांना अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी मिळणारर विशेष लाभ नाकारण्यात यावे, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे या प्रतिनिधींनी केली आहे.