विद्युत तारेचा धक्का बसून नुकत्याच एका जर्मन शेफर्ड कुत्र्याचा शिवबसवनगर येथे मृत्यू झाला या प्रकरणाची दखल हेस्काॅमने घेतली असून या घटनेला स्मार्ट सिटी योजने अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या अर्धवट कामांना जबाबदार ठरविले आहे. तसेच अशा घटना यापुढे घडू नयेत यासाठी खबरदारी घेण्याची विनंती ही हेस्काॅमने स्मार्ट सिटी लिमिटेडला पत्राद्वारे केली आहे.
बेळगाव शहरातील विविध ठिकाणी स्मार्ट सिटी योजनेची कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. परिणामी यापूर्वी अपघात घडवून मनुष्यहानी झाली आहे. आता मुक प्राण्यांनाही आपला प्राण गमवावा लागत आहे. गेल्या शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास शिवबसवनगर येथील केपीटीसीएल स्मार्ट सिटी रस्त्याशेजारी तुटून पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन एक जर्मन शेफर्ड कुत्रा जागीच ठार झाला होता.
या घटनेमुळे शिवबसवनगर परिसरासह शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या घटनेला हेस्कॉमचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप होत असला तरी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केपीटीसील स्मार्ट सिटी रस्त्याचे व्हाइट टॉपिंग करण्यात आले आहे. त्या ठिकाणी एलटी लाईन व्हर्टीकल क्लिअरन्स अंतर कमी झाल्याने अशा घटना घडण्याचा धोका असल्याचे हेस्कॉमचे म्हणणे आहे.
स्मार्ट सिटी योजनेच्या अधिकाऱ्यांना अर्धवट कामाबद्दल बाबत हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा कळविले आहे. भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम स्मार्ट सिटी योजने अंतर्गत हाती घेण्यात आले आहे. मात्र कामास विलंब लागत असल्याने दुर्घटना घडण्याचा धोका आहे. यामुळे अशा घटना घडू नयेत यासाठी खबरदारी घ्यावी, असे स्मार्ट सिटी योजनेच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.
शहरातील विविध भागात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत भूमिगत वीज वाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. मात्र एखाद्या भागात काम पूर्ण झाल्यानंतर हेस्कॉमला त्याची माहिती देण्यात यावी, असे स्मार्ट सिटी लिमिटेडला कळविण्यात आले असल्याची माहिती हेस्कॉम शहर विभाग कार्यकारी अभियंता एम. टी. अप्पणावर यांनी दिली आहे.