हलगा -मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला दिलेली स्थगिती न्यायालयाने पुन्हा एकदा कायम केली असली तरी बायपासचे काम सुरूच ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांकडून उद्या गुरुवारी चौथ्या दिवाणी न्यायालयात तक्रार करून हरकत पत्र दाखल केले जाणार आहे.
उच्च न्यायालयाने ‘झिरो पॉईंट’ निश्चितीसाठी शेतकऱ्यांना दिवाणी न्यायालयात जाण्याची सूचना केली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी याचिका दाखल केलेली असताना देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पोलीस बळाचा वापर करून बायपासचे काम सुरू केले होते. यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामाला तीव्र विरोध करून आंदोलन छेडले होते. मात्र हे आंदोलन मोडीत काढत काम सुरूच ठेवण्यात आले होते. त्यामुळे शेतकर्यांच्यावतीने ॲड. रविकुमार गोकाककर यांनी बेळगावच्या दिवाणी व जेएमएफसी चौथ्या न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने कामाला स्थगिती दिली होती.
यासंदर्भात ठेकेदार कंपनीने कामासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घातली असल्यामुळे काम थांबू नये. स्थगिती उठवून दावा रद्दबातल करावा, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता. त्यावर बायपासचे काम बेकायदा चालले आहे. महामार्ग क्र. 4 ते महामार्ग क्र. 1 रस्ता जोडण्यासंदर्भात प्राधिकरणाकडून कोणताही ठराव नाही. त्यामुळे कंपनीने गुंतवलेले पैसे ही त्यांची चूक आहे. शेतकऱ्यांचा विचार करून योग्य न्याय द्यावा, असा युक्तिवाद ॲड. गोकाककर यांनी केला होता. त्यानंतर न्यायालयाने स्थगिती आदेश देऊन देखील हलगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरूच ठेवण्यात आल्यामुळे शेतकरी उद्या गुरुवार दि. 25 नोव्हेंबर रोजी चौथ्या दिवाणी न्यायालयात तक्रारीसह हरकत पत्र दाखल करणार आहेत. त्यामुळे हे हरकत पत्र दाखल झाल्यानंतर सुनावणीची पुढील तारीख ठरणार आहे.
यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना शेतकरी नेते नारायण सावंत यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला शेत जमिनीमध्ये रस्ते करण्याचा अधिकार नाही, असे सांगितले. केंद्र सरकारने आपल्या नोटिफिकेशनमध्ये तशी तरतूद केली आहे. कारण लोकसभेमध्ये तसा ठराव पास झालेला नाही. या पद्धतीने अंतर्गत जोड रस्ते करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासाठी तशी तरतूद नाही. मात्र याकडे कानाडोळा करून महामार्गाचे रुंदीकरण करण्याऐवजी प्राधिकरणाने बायपास रस्त्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे शेत पिकांसह शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले असल्याचे न्यायालयाला पटल्यामुळेच त्यांनी बायपासच्या कामाला स्थगिती दिली आहे, अशी माहितीही नारायण सावंत यांनी दिली.
दरम्यान, बायपासच्या ठिकाणी सपाटीकरण व अन्य कामासाठी आणलेल्या मशिनी अद्यापि तिथेच आहेत मशीनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मशिनी हटविण्याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेले नाही अशी माहिती दिली आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचं निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.