अन्याय हालगा -मच्छे बायपास रस्ता रद्द करावा, या आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी आज पावसामुळे शेतात साचलेल्या पाण्यात बसून आगळ्या पद्धतीने ठिय्या आंदोलन केले.
बेळगाव शहर परिसरातील पावसाळी वातावरण आणि नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसामुळे हलगा मच्छे बायपास रस्त्याचे काम तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. या परिसरात शेतीत पाणी साचले आहे.
त्याचप्रमाणे आज केंद्र सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधी तीन काळे कृषी कायदे देखील मागे घेतले आहेत. हे कायदे मागे घेतल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्याबरोबरच हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधातील आपले आंदोलन शेतकऱ्यांनी सुरूच ठेवले आहे. यासाठी येळळूर रोड येथे बायपासच्या ठिकाणी शेतामध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यात बसून शेतकऱ्यांनी निदर्शने केली.
बायपास रस्त्याला विरोध दर्शविण्यासाठी आगळ्या पद्धतीने छेडण्यात आलेल्या या ठिय्या आंदोलनात शेतकरी नेते राजू मरवे यांच्यासह सुभाष चौगुले, गोपाळ सोमनाचे, महेश चतुर, भोमेश बिर्जे, भैरू कंग्राळकर, हणमंत बाळेकुंद्री, मनोहर कंग्राळकर, तानाजी हलगेकर आदी शेतकऱ्यांचा सहभाग होता.
एकिकडे पंतप्रधान तीनही काळे कृषी कायदे रद्द करत असताना दुसरीकडे कर्नाटक सरकार आणि जिल्हा प्रशासन बेकायदेशीररित्या सुपीक पिकाऊ शेत जमिनीचे भूसंपादन करून बायपास रस्ता करत आहे. बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांना भुकेकंगाल करण्याचे हे षड्यंत्र आहे. तेंव्हा माननीय पंतप्रधानांनी याकडेही गांभीर्याने लक्ष देऊन या भागातील शेतकऱ्यांना वाचवावे, अशी मागणी यावेळी राजू मरवे यांनी केली.