‘हत्ती डौलाने जात असताना कुत्रे भुंकल्याने कांही होत नाही’ असे वादग्रस्त वक्तव्य करून जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या सीमा लढ्याची खालच्या पातळीवर जाऊन तुलना केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
शहरातील सीपीएड मैदानावर कर्नाटक राज्योत्सव समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री कारजोळ यांनी उपरोक्त वक्तव्य केले. न्यायासाठी लढणाऱ्या मराठी माणसांचा अवमान करताना पुढील काळात सरकार समितीला धडा शिकवेल, अशी वल्गनाही त्यांनी केली. प्रत्येक 50 कि. मी. अंतरावर भाषा बदलते हे लक्षात ठेवून भाषेवरून कोणी आंदोलन करू नये. पाकिस्तान व भारतामधील भांडणाप्रमाणे कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये भांडण होऊ नये. सरकार सर्वांना प्रेमाने व विश्वासाने सोबत घेऊन जाणार आहे.
बेळगाव आता बदलले असून मातृभाषा घरात बोला बाहेर मात्र कन्नड बोला, असा अगांतुक सल्लाही जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी दिला. समितीवर सरकार कारवाई का करत नाही? या कन्नड पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना कांही लोकांनी आपले अस्तित्व दाखविण्यासाठी सीमाप्रश्न जिवंत ठेवला आहे, असा जावईशोध देखील त्यांनी लावला.