सांबरा येथील रहिवासी विमल विठ्ठल चिंगळे यांनी मरणोत्तर देहदान करून ग्रामीण भागात सुध्दा देहदानाबद्दलची जागृती करण्यास हातभार लावला.
काल संध्याकाळी अचानक त्याना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
निधनसमयी त्या ७७ वर्षाच्या होत्या.
दोन वर्षांपूर्वी गणेशपूर येथील लक्ष्मी वालावलकर यांनी जायंट्स आय फौंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपला मुलगा व सुनेसोबत मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला. ही बातमी सांबरा येथील त्यांची जीवाभावाची मैत्रिण विमल चिंगळे यांना आपल्या मैत्रिणीने देहदानाचा संकल्प केल्याचे समजताच चिंगळे यांनीही आपला मरणोत्तर देहदानाचा अर्ज भरून जवाहरलाल महाविद्यालयाचे रितसर प्रमाणपत्र घेतले होते. त्यांच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागात त्या कौतुकास पात्र ठरल्या होत्या.
त्यांच्या निधनानंतर ही बातमी जायंट्स आय फाँडेशनचे संस्थापक मदन बामणे यांना समजताच लागलीच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सांबरा येथे जाऊन अँबुलेन्समधून मृतदेह जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाला सुपूर्द केला.
यावेळी आय फौंडेशनचे अध्यक्ष शिवराज पाटील, अजित कोकणे, अमित कोकितकर यांचे सहकार्य लाभले.
सांबरा गावातील पंच मंडळी, मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठित नागरिक, पाहुणे मंडळी अंत्यदर्शनासाठी उपस्थित होती.