देशातील शेतकऱ्यांच्या विरोधातील तीनही काळे कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेतल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ गेल्या एक वर्षापासून त्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे आनंदोत्सव साजरा केला.
शेतकऱ्यांना रस्त्यावर आणणारे तीन नवे अन्यायी कृषी कायदे मागे घेतले जावेत यासाठी गेल्या वर्षभरापासून देशातील शेतकरी आंदोलन करत आहेत. नवी दिल्ली येथे तर बृहत प्रमाणात शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले होते. बेळगावमध्ये देखील शेतकऱ्यांकडून सातत्याने आवाज उठवला जात होता.
अखेर शेतकऱ्यांसमोर नमते घेताना केंद्र सरकारने तीनही नवे कृषी कायदे कायदे मागे घेण्यात येत असल्याचे आज घोषित केले आहे. याबाबतची माहिती मिळताच कर्नाटक राज्य रयत संघटनेसह हसिरू सेने व इतर शेतकरी संघटनांतर्फे आज सकाळी शहरातील चन्नम्मा सर्कल येथे फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी जय जवान जय किसान, किसान एकता जिंदाबाद आदी घोषणा देऊन शेतकऱ्यांनी चौक दणाणून सोडला होता. या विजयोत्सवात शेतकरी व कामगार संघटनेच्या नेत्यांसह बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते.
याप्रसंगी बेळगाव लाईव्ह समोर प्रतिक्रिया व्यक्त करताना कामगार नेते माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांनी गेल्या 26 नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन उभारले होते. ते कृषी कायदे 1 वर्षांनंतर का होईना मागे घेण्यात आले आहेत. हा शेतकऱ्यांचा विजय असून हा विजय आणि त्यांचे आंदोलन हे ऐतिहासिक ठरले आहे असे सांगून हे काळे कृषी कायदे मागे घेण्यात आले ते उगाच नाही तर त्याला निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. कारण गेल्या पोटनिवडणुकांमध्ये केंद्रातील सत्ताधारी पक्षाला जबर धक्का बसला आहे, असेही ॲड. सातेरी यांनी स्पष्ट केले.
कामगार नेते कॉम्रेड प्रा. आनंद मेणसे म्हणाले की, शेतकऱ्यांनी सातत्याने वर्षभर आंदोलन केले. हे आंदोलन दडपून टाकण्याचा आपल्या राज्यकर्त्यांनी प्रयत्न केला. प्रारंभी आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आणि शेवटी तर शेतकर्यांच्या अंगावर जीप घालून ठार मारण्याचा आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. तथापि शेतकरी घाबरले नाही. त्यांनी आपले एक्य कायम ठेवले आणि या देशात लोकशाही जिवंत आहे हे सिद्ध केले. राज्यकर्त्यांना आपण केलेल्या चुका दुरुस्त कराव्या लागल्या. स्वतःचे केलेले कायदे मागे घ्यावे लागले. तथापि या ठिकाणी आंदोलन थांबत नाही. बँकांचे खाजगीकरण, सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण, शिक्षणाचे खाजगीकरण हे शेतकऱ्यांशी जोडले गेलेले मुद्दे अद्यापी तसेच असल्यामुळे आजचा विजयोत्सव दिन साजरा करताना हा दिन म्हणजे पुढच्या लढ्याची नांदी ठरेल, असा विश्वास प्रा. मेणसे यांनी व्यक्त केला.