मराठी माणसांचा मराठी आत्मा हा कर्नाटकी पिंजऱ्यात अडकला आहे 65 वर्षे चाललेल्या या लढ्यात मराठी माणूस निष्ठेने झगडत आहे. कालपरत्वे बिनीच्या सरदारांमध्ये काही मनं दुखावली होती,परंतु सगळ्यांचा उद्देश्य हा मराठीचा उत्कर्ष हाच असल्याने व सीमा प्रश्न हे ध्येय असल्याने सर्व समविचारी, वैयक्तिक हेवेदावे विसरून समितीच्या एकाच झेंड्याखाली एकवटत आहेत. मराठी माणूस एकमेकांपासून फार दिवस लांब राहू शकत नाही हेच यामुळे समोर आले आहे.
माजी महापौर किरण सायनाक आता एकीच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावण्यासाठी पुढे सरसावले आहेत.तालुका समितीत एकी करण्यासाठी त्यांनीच सुरुवातीला बैठका घेत पुढाकार घेतला होता आता शहरात देखील माजी नगरसेवकांच्या सोबतीने ते पुढे सरसावले आहेत. मनपाचे मागील कार्यकाळातील 32 नगरसेवक मिळून सर्वच समिती नेत्यांची भेट घेणार आहेत.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या होऊ घातलेल्या एकीच्या पाश्वभूमीवर बेळगाव शहरांत देखील एकीचे वारे वाहू लागले आहेत.मराठा सांस्कृतिक भवनमध्ये 25 माजी नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत बेळगाव शहरातदेखील समिती नेत्यात एकोपा घडवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी माजी नगरसेवकानी शहरात पुढाकार घेतला आहे.
डिसेंबर महिन्याच्या आत शहर समितीत एकी करून आगामी हुतात्मा दिन 17 जानेवारी पासून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करू असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
मराठा सांस्कृतिक भवन येथील बैठकीत माजी महापौर सरिता पाटील,माजी महापौर महेश नाईक,माजी उपमहापौर रेणू मुतगेकर , माजी उपमहापौर संजय शिंदे,मीनाक्षी चिगरे, वैशाली हुलजी,मेघा हळदनकर सुधा भातकांडे, रुपा नेसरकर,विनायक गुंजटकर,मनोहर हलगेकर,राकेश पलंगे विजय भोसले राजू बिरजे आदी उपस्थित होते.