बेळगाव शहरातील कुठल्याही मतदारसंघातून जा ,कोणत्याही रस्त्यावरून फिरा, प्रचंड उडणारी धूळ ही सध्या नागरिकांची डोकेदुखी बनत चालली आहे. पाऊस पडायचा बंद झाला. हिवाळ्याचा काळ सुरू झाला.
वरून दिवसा पडणारे रणरणते ऊन आणि उडणारी धूळ याचा सामना करत नागरिकांना बेळगावातून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर या धुळीचा काहीतरी बंदोबस्त करावा आणि रस्त्यांची अवस्था प्रशासनाने लागलीच सुधारावी अशीच मागणी सर्वसामान्य बेळगावकर नागरिक व्यक्त करत आहेत.
बेळगाव शहर स्मार्ट सिटी मध्ये समाविष्ट झाल्यानंतर आपले शहर सुधारणार या भावनेतून नागरिकांनी विकास कामांना पाठिंबा दिला, प्राधान्य दिले, विकासाच्या कामांना पाठिंबा देऊन नागरिकांनी संयम बाळगला होता. मात्र कोरोनाचा काळ आला आणि सर्व कामगार स्थलांतरित झाले.
त्यामुळे अनेक कामे रखडली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर ठीकठिकाणी खड्डे आणि धुळीचा सामना करत नागरिकांना प्रवास करावा लागत असून यामुळे चीड व्यक्त होत आहे. सध्या पावसाळा संपल्यामुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास प्रामुख्याने मोटरसायकल चालकांना आणि पादचाऱ्यांना होत असून गॉगल घातल्याशिवाय फिरणे हे त्रासदायक ठरत आहे. अनेक नेत्र विकारांना जन्म देण्याचा हा प्रकार महागडा ठरत असून शहर केव्हा स्मार्ट होणार असे विचारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
बेळगाव शहर लवकरात लवकर स्मार्ट करा आणि डोळ्यात जाणारी धुळ थांबवा असेच नागरिक बोलून दाखवू लागले आहेत. बेळगाव शहराच्या विकासाचे उडालेले तीन-तेरा थांबवा असेच म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली असून हा विकास रोखण्यासाठी अनेक कारणे आहेत त्यांचीही चर्चा होत आहे.
प्रशासकीय अपयश असो किंवा आणि इतर अनेक कारणे या सर्व कारणात होत असलेली बेळगावची कुरूप सिटी कडे होत असलेली वाटचाल थांबवावी. अशी मागणी नागरिक करत आहेत.