खानापूर तालुक्यातील निसर्गरम्य चिगुळे गावात एक वाईट घटना घडली असून संताप व्यक्त होत आहे. पर्यटनासाठी बेळगाव भागातून आलेल्या तरुणांनी दारूच्या नशेत या गावातील शाळकरी मुलांना मारहाण केली आहे.
चिगूळे मुख्य रस्त्यावर दारूच्या नशेत धिंगाणा घातला व दारूच्या बाटल्या रस्त्यावरती फोडल्या.या घटनेने त्यांना पर्यटक म्हणायचे की धुडगूसखोर? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चिगुळेची सुंदरता पाहण्यासाठी येणाऱ्या या असल्या पर्यटकांना वेळीच आळा न घातल्यास पुढे परिणाम वाईट होऊ शकतात.असा इशाराच या भागातील नागरिकांनी दिला आहे.
दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या युवा वर्गाने यावर लवकरात लवकर विचार करावा असे आवाहन करण्यात आले आहे .
गावाचा विकास जरूर व्हावा असे वाटते. मात्र असे लोक येणे हानी कारक आहे. आमच्या गावातील कणकुंबीला शाळेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे. त्यात काही लहान मुलीही आहेत. म्हणून असल्या युवा पर्यटकाना कणकुंबीहून चिगुळेला घेऊ नये. जेणेकरून आमचा गाव व आमच्या गावातील विद्यार्थी सुखरूप राहतील. अशी मागणी चिगुळे ग्रामस्थांनी केली आहे.
खानापूर तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात पर्यटक निसर्ग सौन्दर्य अनुभव करण्यासाठी म्हणून येतात मात्र निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यापेक्षा दारू पिऊन दंगा घालण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असतो. यामुळे अशांवर आता पोलीस विभागाने लक्ष ठेवावे. अशी मागणी खानापूर तालुक्यातील जनतेकडून होत आहे .