बेळगाव शहरातील तांगडी गल्ली येथील फुटलेल्या ड्रेनेज पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रयत्न आणि स्थानिक नगरसेवकांच्या पुढाकाराने काल मंगळवारपासून हाती घेण्यात आल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील महापालिकेच्या प्रभाग क्र. 10 मधील तांगडी गल्ली येथे असलेली ड्रेनेज पाईपलाईन गेल्या सुमारे 3 वर्षांपूर्वी फुटली होती. त्यामुळे सांडपाणी तुंबून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्यामुळे गल्लीतील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. पावसाळ्यामध्ये तर परिस्थिती अधिकच बिकट होत होती.
सदर फुटलेल्या ड्रेनेज पाईपलाईनबद्दल वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेण्यात येत नव्हती. मात्र आता सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ भातकांडे यांच्या प्रयत्नामुळे आणि प्रभागाच्या नूतन नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या पुढाकाराने तांगडी गल्लीतील ड्रेनेज पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
खोदकाम करून फुटलेल्या ड्रेनेज पाईप काढून त्याठिकाणी नव्या चिनीमातीच्या पाईप घातल्या जाणार आहेत. ड्रेनेज दुरुस्तीच्या कामामुळे सांडपाणी आणि दुर्गंधीमुळे त्रस्त झालेल्या तांगडी गल्लीतील रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त होत असून ते नूतन नगरसेविका वैशाली भातकांडे व सिद्धार्थ भातकांडे यांना दुवा देत आहेत.