दुर्दशा झालेल्या बेळगाव -चोर्ला रस्त्यासह गोव्याला जोडणाऱ्या अन्य दोन प्रमुख रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती व नूतनीकरण केले जावी या बेळगावच्या भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी आज केलेल्या मागणीची दखल केंद्रीय रस्ते व सार्वजनिक वाहतूक खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी तात्काळ घेतली असून त्यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अध्यक्षांना केली आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीनही राज्यासाठी मध्यवर्ती असलेला बेळगाव जिल्हा हा व्यापार -व्यवसायाचे केंद्र असून रेल्वे आणि विमान सेवेद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडला गेलेला आहे. त्याचप्रमाणे कोकण पट्ट्यासाठी बेळगावची बाजारपेठ महत्त्वाची आहे. तेंव्हा आज खळगे पडून वाताहत झालेला बेळगाव -चोर्ला -गोवा रस्ता, बेळगाव -अनमोड -गोवा रस्ता आणि मोलेम -एमआरएफ गोवा फॅक्टरी रस्ता या तिन्ही रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करून त्यांचे नूतनीकरण केले जावे, अशी मागणी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स आणि कापड व्यापारी संघटनेसह भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी आज मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास खासदार मंगला अंगडी आणि केंद्रीय रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक खात्याचे मंत्री नितिन गडकरी यांना ई-मेल निवेदनाद्वारे केली होती.
सदर निवेदनाची त्वरित दखल घेऊन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ई-मेलद्वारे दुपारी 1:30 च्या सुमारास भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) चेअरमन अर्थात अध्यक्ष संकेत भोंडवे यांना यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.
बेळगाव -चोर्ला रस्त्यासह गोव्याला जोडणाऱ्या दुर्दशा झालेल्या अन्य दोन प्रमुख रस्त्यांसंदर्भात आता डॉ. सोनाली सरनोबत यांनीही पुढाकार घेतल्यामुळे संबंधित रस्त्यांची दुरुस्ती व नूतनीकरण लवकरच सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप नेत्या होण्याबरोबरच एक जबाबदार नागरिक या नात्याने डाॅ. सोनाली सरनोबत यांनी चोर्ला व अन्य रस्त्यांसंदर्भात घेतलेल्या या भूमिकेचे सर्व थरात स्वागत होत आहे.