दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी ,
गायीचा चारा,
बैल निवारा,
कृषी संस्कृतीचा उल्हास म्हणजे सण.. जेंव्हा धर्ती पोसवते आणि उदंड हाताने बळीराजाच्या पदरात आपल्या हाताने माप टाकते त्या क्षणांचा उत्सव म्हणजे सण दिवाळीचा…
पंजाब हरियाणा मध्ये गहू पिकांची मळणी होते त्या काळात *बैसाखी* हा सण साजरा केला जातो त्याच धर्तीवर बेळगाव भागात भात पिकाच्या मळणीच्या काळात *दिवाळी* सण येतो.शेतकरी या काळात आनंदी झालेले असतात घरात धान्याची पोती येणार असतात त्यामुळे ते दिल खुश असतात.
शेतकऱ्यांच्या प्रत्येक घामाच्या थेंबा सोबत त्याचे पशुधन देखील त्याच्या सोबत राबलेला असतो. तो त्याचा सखा सोबती आणि सुख दुःखाचा वाटेकरी असतो म्हणून शेतकऱ्याचे प्रत्येक सण हे त्याच्या पशु धना बरोबर जोडलेले असतात.
आज बलीप्रतिपदा दिवशी आपल्या म्हशींना सजवून त्यांच्या शिंगाना घोंडे लाऊन, गळ्यात साखळ्या,रंगीत मन्यांच्या माळा
पायात घोंडे चाळ, शिंगाना रंग, अंगावर गेरूचे ठसे उमटून त्यांना सजवले जाते. म्हशी म्हणजे ग्राम जीवनातील विकास गंगाचं. दूध दुपत्याने घर ओसंडून वाहायला लावणाऱ्या गंगाचं ,शेतकऱ्यांच्या अपार जीव असतो त्याही आपल्या मालकाशी लडिवाल पणे चाळाचं करत रहातात आणि त्याचाच बनतो अनोखा खेळ, आपल्या म्हशी किती आज्ञेत आहेत हे दर्शवण्यासाठी काही स्पर्धा घेतल्या जातात.
तीन हाकेत म्हैस बोलावणे, गाडी बरोबर म्हैस पळवणे अश्या पद्धतीच्या या स्पर्धा बेळगावात विविध ठिकाणी शुक्रवारी भरवल्या होत्या.वडगांव रयत गल्ली, पाटील गल्ली, कंग्राळ गल्ली चव्हाट गल्ली, कोनवाळ गल्ली, हलगा सह ग्रामीण भागात भरवल्या गेल्या होत्या.बेळगाव हे अर्ध ग्रामीण शहर आहे शहरी संस्कृतीला ग्रामीण जीवनाची चांगली ओळख आहे त्यामुळे शेतकऱ्यां बरोबर शहरी लोकांनीही या म्हैस शर्यतीचा आनंद मनमुराद लुटला.