आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रांना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज शनिवारी सकाळी भेट देऊन पाहणी केली.
शहरातील बी. के. मॉडेल हायस्कूल आणि ज्योती कॉलेज याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी ही पाहणी केली. जिल्ह्यातील विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 14 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी बी. के. मॉडेल हायस्कुल आणि ज्योती कॉलेजला भेट देऊन इमारतीची आणि तेथील मूलभूत सुविधांची पाहणी केली. स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्र स्थापण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वर्गखोल्यांचे निरीक्षण करून या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिकारी आणि संस्थेच्या प्राचार्यांशी चर्चा केली.
यावेळी दोन्ही इमारती सर्वांगाने योग्य असल्याने त्या मतमोजणी केंद्रासाठी निश्चित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, तहसीलदार आर. के. कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता संजीवकुमार हुलकावी आदी अधिकारी उपस्थित होते.