बेळगाव विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या प्रारुप मतदार यादीत बेळगावच्या 58 नगरसेवकांची नांवे समाविष्ट करण्यात आली असून एक खासदार, तीन विधानसभा सदस्य व दोन विधान परिषद सदस्यांचाही समावेश करण्यात आला आहे. अंतिम मतदार यादी रविवार दि 21 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून त्यात नांवे समाविष्ट झाली तरच नगरसेवकांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे.
विधान परिषदेच्या बेळगाव मतदार संघाच्या प्रारुप मतदार यादी यावेळी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ आणि सरकार नियुक्त विधान परिषद सदस्य साबण्णा तळवार यांचाही समावेश आहे. यापूर्वी विधान परिषद सदस्यांची नांवे यादीत समाविष्ट झालेली नव्हती. त्यामुळे महापालिकेच्या सदस्यांची संख्या आता 64 झाली आहे. यावेळी यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी व चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची नांवे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.
विधानपरिषद निवडणुकीसाठीची प्रारुप मतदार यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून एम. जी. हिरेमठ यांनी गेल्या 11 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली होती. त्यावर आक्षेपही मागविण्यात आले होते. त्या प्रारुप मतदार यादीत महापालिकेच्या 64 जणांचा समावेश करण्यात आला
असून त्यात 58 नगरसेवकांसह चार आमदार ,कवटगीमठ यांचाही समावेश आहे. भाजपने महांतेश कवटगीमठ यांनाच पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. यावेळी ते महापालिकेचे सदस्य म्हणून मतदान करणार हे विशेष होय.