देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महान स्वातंत्र्यसैनिकांबद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौत यांचा पद्मश्री पुरस्कार तात्काळ काढून घेण्यात यावा, अशी मागणी बेळगावचे वकील ॲड. हर्षवर्धन पाटील यांनी एका पत्राद्वारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे.
अभिनेत्री कंगना रानौत यांचा पद्मश्री पुरस्कार तात्काळ काढून घेण्यात यावा या मागणीचे पत्र बेळगावचे वकील ॲड. हर्षवर्धन पाटील यांनी आज शनिवारी राष्ट्रपतींना धाडले आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री कंगना रानौत यांनी नुकत्याच एका टीव्ही शोमध्ये भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य ही ‘भीक’ होती, असे वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य म्हणजे महान स्वातंत्र्य सैनिक महात्मा गांधी, भगतसिंग आदींसारख्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या देशातील स्वातंत्र्यवीरांचा अवमान आहे.
स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानामुळेच ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपला देश स्वतंत्र झाला आहे हे सर्वश्रुत आहे. तेंव्हा कंगना रानौत यांच्या अवमानकारक वक्तव्यामुळे करोडो देशवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांचे वक्तव्य देशद्रोही स्वरूपाचे आहे.
तरी याची गांभीर्याने दखल घेऊन कंगना रानौत यांना प्रदान करण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा. तसेच त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवून गुन्हा दाखल केला जावा, अशा आशयाचा तपशील ॲड. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रपतींना धाडलेल्या पत्रात नमूद आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांनी या पद्धतीने कंगना रानौत यांचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा अशी मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातून तशी मागणी अद्याप कोणी केली नव्हती, ती ॲड. हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.