ख्रिश्चन धर्मीयांनी रविवारची सामूहिक प्रार्थना आयोजित करू नये अशी पोलिसांनी केलेली सूचना आणि प्रार्थना स्थळांवर हल्ले करून प्रार्थनेला मज्जाव करण्याचे हिंदू संघटनांचे प्रकार जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहेत.
तेंव्हा ख्रिश्चन धर्मियांना ईश्वराची प्रार्थना करताना पोलीस संरक्षण दिले जावे, अशी मागणी बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्याकडे करण्यात आली आहे.
बेळगाव डायोसिसचे बिशप डेरेक फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालील ख्रिश्चन समुदायाच्या नेत्यांनी आज बुधवारी पोलीस आयुक्त डाॅ. त्यागराजन यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.
यावेळी पोलीस आयुक्तांना त्यांच्या हाताखालील पोलीस अधिकाऱ्यांनी ख्रिश्चन धर्मीयांनी रविवारची सामूहिक प्रार्थना आयोजित करू नये अशी केलेली सूचना आणि प्रार्थना स्थळांवर हल्ले करून प्रार्थनेला मज्जाव करण्याचे हिंदू संघटनांचे जिल्ह्यातील प्रकार याबाबत माहिती दिली.
बिशप फर्नांडिस यांच्यासह उपस्थित ख्रिश्चन नेते मंडळींचे म्हणणे ऐकून घेऊन पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन यांनी पोलीस अधिकाऱ्यानी ख्रिश्चन धर्मियांना केलेल्या प्रार्थना न करण्याच्या सूचनेची शहानिशा केली जाईल.
चौकशीअंती योग्य निर्णय घेण्याबरोबरच आवश्यकता भासल्यास ख्रिश्चन धर्मियांना प्रार्थनेच्या वेळी पोलीस संरक्षण पुरविले जाईल, असे आश्वासन दिल्याचे बिशप डेरेक फर्नांडिस यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. याप्रसंगी ख्रिश्चन समुदायाचे नेते उपस्थित होते.