केंद्रीय रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वीय सचिवांनी बेळगाव ट्रेडर्स फोरमने आज चोर्ला रस्ता दुरुस्तीसंदर्भात धाडलेल्या निवेदनाची दखल घेतली असून लवकरच चोर्ला रस्त्याचे काम हाती घेतले जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या रस्त्याचे भाग्य लवकरच उजळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
बेळगाव ट्रेडर्स फोरमचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी बेळगाव लाईव्हला उपरोक्त माहिती दिली. खाचखळगे खड्डे पडून दुर्दशा झालेल्या चोर्ला रस्त्यासंदर्भात आज सकाळी आपण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता संजीव हुलिकाई यांना निवेदन सादर करण्याबरोबरच कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांना देखील निवेदनाची प्रत धाडली होती.
त्यानंतर निवेदनासंदर्भात आपण दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वीय सचिव वाडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी निवेदनाची प्रत नजरेखालून घालण्याबरोबरच आपल्याकडून चोर्ला रस्त्याची समस्या आणि त्याचे प्रतिकूल परिणाम याची माहिती जाणून घेतली. तसेच तात्काळ मुख्य अभियंता संजीव हुलिकाई यांच्याशी संपर्क साधून रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात सूचना करण्याचे आश्वासन दिले असल्याचे सतीश तेंडुलकर यांनी स्पष्ट केले.
स्वीय सचिव वाडेकर यांना चोर्ला रस्त्याची माहिती देण्याबरोबरच तेंडुलकर यांनी त्यांना या रस्त्यासंदर्भात बेळगाव लाईव्हसह अन्य प्रसिद्धीमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांचे ऑडिओ -व्हिडिओ देखील पाठवले आहेत. गेल्या दीड-दोन वर्षांपासून चोर्ला रस्त्याची दुर्दशा झाली आहे. सदर रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात वारंवार मागणी व अर्ज विनंत्या करण्याबरोबरच आंदोलन करून देखील त्याची दखल घेण्यात आली नव्हती.
मात्र आता केंद्रीय मंत्र्यांच्या स्वीय सचिवांनी बेळगाव ट्रेडर्स फोरमच्या तक्रारीची दखल घेतल्यामुळे दुर्लक्षित असलेल्या या रस्त्याचे भाग्य आता लवकरच उजळणार हे निश्चित आहे. त्याचप्रमाणे सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखालील बेळगाव ट्रेडर्स फोरमने चोर्ला रस्ता दुरुस्तीसंदर्भात सुरू केलेल्या पाठपुराव्याला यश मिळण्यास सुरुवात झाली आहे हेही तितकेच खरे आहे.