भाषावार प्रांतरचने वेळी केंद्र सरकारच्या एका चुकीमुळे बेळगावसह संपूर्ण सीमाभाग कर्नाटकात डाबला गेल्याच्या निषेधार्थ 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून मराठी भाषिक गेल्या 65 वर्षांपासून आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे. त्यानुसार कर्नाटक पोलिसांच्या प्रचंड दडपशाहीला झुगारून शेकडो मराठी भाषिकांनी आज 1 नोव्हेंबर रोजी रेल्वे ओव्हर ब्रिज येथील मराठा मंदिर येथे उपस्थिती दर्शवून महाराष्ट्रात जाण्याचा आपला वज्रनिर्धार पुन्हा एकदा प्रकट केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मुक सायकलफेरीसह जाहीर आंदोलनाला निर्बंध घातल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठा मंदिर येथे आज सोमवारी सकाळी निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सभेला परवानगी देण्यास पोलिसांची टाळाटाळ सुरू होती. तथापि पोलिसांची दडपशाही झुगारून शेकडो मराठी भाषिक सभेला उपस्थित होते.
या सभेत मराठी व्देष्ट्या केंद्र सरकारसह सीमाभागातील मराठी भाषिकांना अन्याय वागणूक देणाऱ्या राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेप्रसंगी समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणयेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, राजाभाऊ पाटील, रणजीत चव्हाण -पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार मनोहर किणयेकर म्हणाले की छ. शिवाजी महाराजांचे खरं हिंदुत्व जे आहे ते महाराष्ट्र एकीकरण समितीने जपले आहे. बेळगाव महापालिकेवरील भगवा ध्वज काढून राष्ट्रीय पक्षांनी आपला भगवा द्वेष दाखवून दिला आहे. तेंव्हा युवापिढीने राष्ट्रीय पक्षांच्या भूलथापांना बळी न पडता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी रहावे.
महाराष्ट्रातील मंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ तेथून वक्तव्य करू नये. गेली दोन वर्षे ते बेळगावसह सीमाभागात येण्याचे आश्वासन देत आहेत. त्यांनी एकदा सीमाभागात येऊन मराठी भाषिकांचे दुःख जाणून घ्यावे. महाराष्ट्रातील नेते पाठिंबा देवोत अथवा न देवोत, मात्र बेळगावातील मराठी भाषिक आपला लढा सुरूच ठेवतील. प्राणपणाने आपण लढूया आणि यासाठी सर्वांनी संघटित होऊया, असेही माजी आमदार किणेकर म्हणाले.
…अन् कडाडल्या रणरागिनी!
… तर मग मनपावर भगवा फडकवून दाखवा
कोरोनाच्या नांवाखाली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखालील निषेधात्मक मुख्य सायकल फेरीला निर्बंध घालणाऱ्या कर्नाटक प्रशासनाचे मनसुबे धुळीस मिळविण्यासाठी मराठा मंदिर येथे आज आयोजित धरणे आंदोलनात सीमाभागातील मराठी रणरागिनी चांगल्याच कडाडल्या.
कर्नाटक शासनाची मुस्कटदाबी कदापि खपवून घेतली जाणार नाही, असा कडकडीत इशारा देतानाच घटनात्मक न्याय हक्कांची पायमल्ली करणाऱ्या कर्नाटक शासनाच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता न्यायहक्कासाठी सुरू असलेल्या सीमा लढ्याची धार कायम ठेवू, असा निर्वाणीचा इशाराही या रणरागिनी कर्नाटक सरकारला दिला. रेल्वे ओव्हर ब्रिज नजीकच्या मराठा मंदिर येथे 1 नोव्हेंबर काळा दिनानिमित्त आज सकाळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिकांची निषेध सभा उस्फुर्त प्रतिसादात पार पडली. या सभेमध्ये बोलताना माजी महापौर सरिता पाटील यांनी बेळगाव महापालिकेवर वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा संदर्भ घेऊन स्वतःला हिंदू म्हणवून घेत असाल तर महापालिकेवर भगवा फडकवून दाखवा, असे उघड आव्हान दिले. सीमाप्रश्नासाठी चाललेला हा लढा आमच्या अस्तित्वाचा लढा असून या लढ्यात आम्हाला जितक्या वेदना द्या तितके आम्ही पेटून उठू, असे सरिता पाटील यांनी स्पष्ट केले.
सध्याची परिस्थिती गंभीर असली तरी मराठी युवक लढ्यासाठी खंबीर आहे असे सांगून प्रशासनाची मुस्कटदाबी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा जि. पं. सदस्य सरस्वती पाटील यांनी दिला. म. ए. समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी यावेळी बोलताना न्यायालयीन लढा सोबतच आता रस्त्यावरील लढाई गरजेची असल्याचे सांगितले. न्याय हक्काने किंवा लोकशाही मार्गाने चाललेल्या सीमाप्रश्नाच्या लढ्यात कर्नाटकी प्रशासन हेतुपुरस्सर आडकाठी आणून मराठी युवकांना अकारण भडकवण्याचा आणि त्यांच्यावर खटले दाखल करून कचाट्यात अडकवण्याचा डाव आखत आहे. मात्र कर्नाटक प्रशासनाने लक्षात ठेवावे की सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्ही प्रत्येक जण जीव देण्यासाठीही तयार आहोत, असेही किल्लेकर म्हणाल्या.