तीळ्यांना जन्म दिल्यानंतर एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गेल्या शुक्रवारी सिव्हील हॉस्पिटलमध्ये घडली होती. याची गांभीर्याने दखल घेऊन हॉस्पिटलच्या प्रसूती विभागातील चार डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यामुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पवित्रा मडिवाळ (रा. केंगानूर, ता. बैलहोंगल) या गर्भवती महिलेला गेल्या गुरुवारी प्रसूतीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी असलेल्या डॉक्टर आणि तिची तपासणी करून रात्री प्रस्तुती होण्याची शक्यता वर्तविली. तसेच तिला वॉर्डमध्ये हलविण्यात आले. मात्र त्याठिकाणी तिला प्रचंड वेदना सुरू झाल्याने कुटुंबीयांनी त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांकडे विनवणी करून डॉक्टरांना बोलावण्याची मागणी केली. तथापि तेथे डॉक्टरच उपलब्ध नव्हते. संतप्त कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेताच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (5 नोव्हें. रोजी) त्याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी तिच्यावर उपचार सुरू केले. मात्र तिची प्रकृती खालावत गेली अशा परिस्थितीतही तिने तिळ्याला जन्म दिला. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
या साऱ्या प्रकारामुळे मडिवाळ कुटुंबीयांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील भोंगळ कारभारामुळे आपल्याला रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. या दुर्दैवी घटनेबद्दल प्रसारमाध्यमांनी आवाज उठविताच खडबडून जागे झालेल्या बीम्सचे संचालक डाॅ. आर. जी. विवेकी यांनी प्रसूती विभागातील चार डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.