बेळगाव पासून सांबरा विमानतळाकडे जाण्यासाठी कर्नाटक परिवहन महामंडळाची चांगली बस सेवा उपलब्ध करून द्या. अशी मागणी जोर धरत आहे .
सध्या तेथे जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे खासगी टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागत असून यामुळे विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांना पुन्हा शहराकडे येण्यासाठी किंवा विमानतळाकडे जाण्यासाठी प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
सांबरा विमानतळाचा विकास झाल्यापासून ही मागणी होत असून या संदर्भात आता ट्विटरद्वारे जन मोहीम सुरू करण्यात आली आहे. सध्या अनेक शहरांना बेळगावच्या विमानतळावरून विमानसेवा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात विमान सेवेचा वापर करत आहेत.
सर्वच नागरिकांकडे विमान सेवेचा लाभ घ्यायला जाण्यासाठी स्वतःची वाहने नसतात. त्यामुळे इतर वाहनांचा आधार त्यांना घ्यावाच लागतो. अशा परिस्थितीत बससेवा नसल्यामुळे खाजगी वाहनांचा वापर करून त्यांना विमानतळापर्यंत जावे लागत असून, आर्थिक भुर्दंड पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
खासदार मंगला अंगडी यांनी विशेष प्रयत्न करावेत. राज्याचे परिवहन मंत्री बी एस श्रीरामुलु यांनीही या विमानसेवेचे बाबतीत विशेष प्रयत्न करावेत असे आवाहन ट्विटरवरुन केले जात आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
.कर्नाटक परिवहन महामंडळाकडे अनेक वापरात नसलेल्या बस शिल्लक आहेत. त्या बसचा वापर बेळगाव ते सांबरा विमानतळ या मार्गासाठी करून नागरिकांची सोय करावी .आणि महसूल ही मिळवावा. अशीही मागणी आहे.