अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बेळगाव बार असोसिएशन निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज सकाळी 10 वाजता प्रारंभ झाला असून मतदानाला सकाळच्या सत्रात वकिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे पहावयास मिळाले.
बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी एकूण 40 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. बेळगाव न्यायालयातील वकील समुदाय भवन येथे निवडणुकीच्या मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यामुळे आज सकाळपासून या मतदान केंद्राच्या परिसरात वकिलांची गर्दी झाली होती. सकाळच्या सत्रात वकीलवर्ग हिरिरीने आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत होता. बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनीही आज दुपारच्या सुमारास न्यायालय आवारात येऊन आवर्जून मतदानाचा हक्क बजावला.
गेल्या दहा दिवसांपासून बार असोसिएशनच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. अध्यक्षपदासाठी ॲड. डी. एम. पाटील आणि ॲड. प्रभू यतनट्टी निवडणूक लढवत आहेत. या दोघांमध्ये थेट लढत असून कोण बाजी मारणार? हे आज रात्री मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
निवडणुकीचे मतदान सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत चालणार असून पुढे सायंकाळी 6 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे साधारण रात्री 8 च्या सुमारास निवडणुकीचा निकाल बाहेर पडण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. प्रारंभी कमिटी आणि इतर पदांची मतमोजणी होईल. त्यानंतर अध्यक्षपदाच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. रात्री उशिरापर्यंत ही मतमोजणी होण्याची शक्यता आहे.