भारतीय हवाई दलाच्या ट्रेनिंग कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग -इन -चीफ एअर मार्शल मनवेंद्र सिंग यांनी आज सोमवारी सकाळी सांबरा येथील हवाईदलाच्या एअरमन ट्रेनिंग स्कूलला सदिच्छा भेट दिली.
सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे स्कूलचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस. डी. मुकुल यांनी एअर मार्शल मनवेंद्र सिंग यांचे स्वागत केले. यावेळी ट्रेनिंग स्कूलच्या एअरमन्सनी सिंग यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला.
त्यानंतर एअर मार्शल मनवेंद्र सिंग यांनी एअरमन ट्रेनिंग स्कूलची पाहणी केली. यावेळी त्यांना एअर ऑफिसर कमांडिंग मुकुल आणि सांबरा हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या प्रशिक्षणांची माहिती दिली.
ट्रेनिंग स्कूलच्या पाहणीप्रसंगी सांबरा एअरफॉर्स स्टेशनच्या नॉर्थ कॅम्पच्या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या शॉपिंग सेंटरचे एअरमार्शल सिंग यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आपल्या सदिच्छा भेटी प्रसंगी एअर ऑफिसर कमांडिंग -इन -चीफ मनवेंद्र सिंग यांनी उपस्थित हवाईदल अधिकाऱ्यांशी संवाद साधला. प्रशिक्षणार्थी एअरमन हे भारतीय हवाई दलाचे भविष्य असल्यामुळे ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षणाचा दर्जा कायम उच्च दर्जाचा राखला जावा असे त्यांनी सांगितले.
भविष्यातील संघर्षाला यशस्वी तोंड देण्यासाठी विकसित तंत्रज्ञानाशी सहगती ठेवा, असा सल्लाही एअर मार्शल मनवेंद्र सिंग यांनी दिला.