बेळगाव -खानापूर महामार्गावरील मैलाच्या दगडावरील चुकीच्या मराठी नांवाची दुरुस्ती आज तात्काळ युद्धपातळीवर करण्यात आली असली तरी पुन्हा दुसऱ्यांदा देखील झाडशहापूर गावाचे नाव ‘झाडथापूर’ असे चुकीचे लिहिण्यात आले आहे. या चुकीच्या पुनरावृत्ती मुळे मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बेळगाव -खानापूर महामार्गावर झाडशहापूर ते मच्छे दरम्यान उभारण्यात आलेल्या मैलाच्या दगडावर गांवाच्या मराठीतील नांवाची मोडतोड केली आहे. झाडशहापूरचे नांव ‘जदसाठापूर’ आणि वाघवडे ऐवजी ‘दागवादे’ असे चुकीचे लिहिण्यात आले होते.
त्यामुळे वाचणाऱ्यांना त्यातून कोणताही अर्थबोध होत नव्हता. चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आलेल्या या मराठी नांवाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी मराठीभाषिकातून करण्यात आली होती.
माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी देखील यासंदर्भात संबंधित कंत्राटदाराला जाब विचारला होता. त्या कंत्राटदाराने आपली चूक मान्य करून मैलाच्या दगडावरील नांवाची दुरुस्ती करून तात्काळ मराठीतील नांवे बिनचूक व्यवस्थित लिहिली जातील असे सांगितले होते.
त्यानुसार झाडशहापूर गावानजीकच्या रस्त्या शेजारील मैलाच्या दगडावरील मराठी नांवाची दुरुस्ती करण्यात आली. मात्र ही दुरुस्ती करताना पुन्हा चुकीची पुनरावृत्ती करण्यात आली. दुसऱ्यांदा चूक करताना झाडशहापूर गावाचे नांव ‘झाडथापूर’ असे लिहिण्यात आले आहे.
त्यामुळे हा प्रकार जाणून बुजून तर केला जात नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्याच प्रमाणे मराठीचे चांगले ज्ञान असणाऱ्या व्यक्तीकडून मैलाच्या दगडावरील गावांची नावे लिहून घ्यावीत, अशी मागणी केली जात आहे.