महाविद्यालयात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामुळे कोरोना संसर्गाचा उद्रेक होऊन हुबळीच्या एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 66 विद्यार्थी कोरोना बाधित झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यामुळे प्रशासन हादरले असून महाविद्यालयातील कार्यक्रमात सुमारे 200 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
जिल्हाधिकारी नितीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत जवळपास 66 विद्यार्थी-विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सुमारे 500 विद्यार्थी विद्यार्थिनींच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
त्यापैकी 66 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या संपर्कातील (प्रायमरी कॉन्टॅक्ट्स) सर्वांची तपासणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाविद्यालयाचे वसतीगृह सील करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी स्वॅबचे नमुने दिले आहेत, त्यांना काॅरंटाईन करण्यात आले असून त्यांच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी कोरोना बाधित आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे सांगून हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले रुग्ण आणि त्यांच्या मदतनिसांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी निलेश पाटील यांनी केले आहे.
त्याप्रमाणे जोपर्यंत महामारी संपुष्टात येत नाही तोपर्यंत हुबळी-धारवाड या जुळ्या शहरातील नागरिकांनी देखील कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी विनंतीही जिल्हाधिकार्यांनी केली आहे.