साप म्हटलं की आपण भीतीने एक पाऊल मागे सरकतो. तथापि हा वन्यजीव शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. हेच मित्रत्वाचे नाते आज एका अस्सल नाग सापाने एका युवा शेतकऱ्यांशी कांही काळ खेळून जणू सिद्ध केल्याची घटना आज अनगोळ येथे घडली.
अनगोळ येथील सोमणगिरी तलावानजीक असलेल्या आमराई परिसरात आज सकाळी एक अस्सल नागसाप अभिषेक हनमण्णावर या युवा शेतकऱ्यांशी जवळपास अर्धा तास खेळवून आपल्या वाटेने निघून गेला. हनमण्णावर गल्ली, अनगोळ येथील अभिषेक हनमण्णावर हा आज सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे निघाला होता. त्यावेळी सोमणगिरी तलावा नजीकच्या अमराई जवळ त्याला एक मोठा नागसाप आढळला.
सर्वसामान्यपणे मनुष्यप्राण्याची चाहूल लागताच साप एकतर डंख मारण्यासाठी अंगावर धावून येतात किंवा तात्काळ सुरक्षित स्थळी पळ काढतात. तथापि अभिषेकला पाहून जवळपास तब्बल 6 फूट लांबीच्या त्या नाग सापाने आक्रमक पवित्रा घेतला नाही किंवा जागेवरून पळही काढला नाही. उलट मित्रत्व दाखवून तो अस्सल नाग अभिषेकच्या तालावर हालचाली करू लागला. अभिषेककडून त्याने आपले फोटो देखील काढून घेतले. या पद्धतीने जवळपास अर्धा तास अभिषेक याच्याशी खेळून तो नागसाप आपल्या वाटेने निघून गेला.
साप हा सरपटणारा प्राणी पिकांचे नुकसान करणाऱ्या शेतातील उंदीर -घुशींचा फडशा पाडून शेतकऱ्यांना मदत करत असतो. त्यामुळे एक प्रकारे तो शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. तथापि आज अभिषेक याला आढळलेल्या नागसापाने कांही काळ चक्क त्याच्याशी खेळून शेतकरी व साप यांचे मित्रत्वाचे नाते दाखवून दिले.
त्याच प्रमाणे डिवचल्या शिवाय साप कोणाला इजा पोचवत नाही हे देखील या नागाने सिद्ध केले. दरम्यान, अत्यंत विषारी धोकादायक अस्सल नाग सापाच्या या मित्रत्वाच्या वर्तणुकीबद्दल जाणकारांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून अनगोळ परिसरात हा एक चर्चेचा विषय झाला आहे.