बेळगाव महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांच्या छळाच्या तक्रारीवर सुनावणी घेण्यास महापालिका आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांनी परवानगी दिली आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर महापालिकेतील प्रथम दर्जा सहाय्यकांची मंगळवारी चौकशी सुरू झाली असून महिला कर्मचारी अन्याय निवारण समितीकडून ही चौकशी केली जात आहे.
प्रथम दर्जा सहाय्यकांना विरोधात चार महिला कर्मचाऱ्यांनी समितीकडे लेखी तक्रार दिली आहे. तथापि महापालिकेतील आणखी कांही महिला कर्मचाऱ्यांची छळवणूक झाल्याची माहिती समितीला मिळाले आहे. त्यामुळे त्या महिलांना बोलावून त्यांच्याकडूनही मंगळवारी माहिती घेण्यात आली. प्रथम दर्जा सहाय्यकाने वेळी-अवेळी पाठवलेले व्हाट्सअप मेसेज तसेच अन्य तक्रारीही महिला कर्मचाऱ्यांनी समितीसमोर मांडल्या आहेत.
महापालिकेच्या अधीक्षक अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर या समितीच्या प्रमुख असून त्यांच्या कक्षातच महिला कर्मचाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. सहायकाचे म्हणणेही ऐकून घेतली जाणार असून त्याचा अहवाल आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्याकडे सादर केला जाणार आहे.
आठवडाभर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या छळाचे हे प्रकरण दडपले गेले की काय? अशी चर्चा महापालिकेत सुरू होती. मात्र आता समितीने तक्रारदार महिलेसह अन्य महिलांना बोलावून त्यांच्याकडून ही माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या प्रकरणी योग्य निवाडा होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या आठवड्यात या तक्रारीवर पुढील कारवाई होणे अपेक्षित होते, पण आयुक्त डाॅ. घाळी रजेवर असल्यामुळे कार्यवाही होऊ शकले नाही. गेल्या सोमवारी समितीच्या प्रमुख निप्पाणीकर यांनी आयुक्तांची भेट घेतल्यानंतर तक्रारीवर सुनावणी घेण्यास या प्रकरणाची चौकशी करण्यास आयुक्तांनी परवानगी दिली. त्यानुसार मंगळवारी चौकशीला सुरुवात झाली आहे.