एकिकडे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी कोरोना नियमांचे पालन करुन कर्नाटक राज्योत्सव साजरा केला जाईल, असे म्हंटले असताना दुसरीकडे कन्नड संघटनांनी अभूतपूर्व उत्साहात राज्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
कन्नड नेते अशोक चंदरगी यांनी तर महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात तेथील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली राज्योत्सव साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
बेळगावात यंदा अभूतपूर्व उत्साहात कर्नाटक राज्योत्सव साजरा करण्याचा निर्णय आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कन्नड संघटनांच्या नेतेमंडळींच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे उत्तर कर्नाटकचे मुंबई कर्नाटक हे नांव बदलून कित्तूर कर्नाटक असे नामकरण करण्याची मागणी यावेळी सर्वानुमते करण्यात आली.
आगामी राज्योत्सव साजरा करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी येत्या शनिवार दि. 16 ऑक्टोबर रोजी कन्नड साहित्य भवन येथे शहरातील कन्नड संघटनांची बैठक बोलवण्याचे आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आले.
यावेळी बोलताना कन्नड नेते अशोक चंदरगी यांनी राज्योत्सव अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्याचा एक भाग म्हणून यावेळी बेळगाव महापालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये तेथील नवनिर्वाचित नगरसेवकाच्या नेतृत्वाखाली कर्नाटक राज्योत्सव साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.