‘गाव करील ते राव काय करील’ या उक्ती प्रमाणे अख्ख बेळगाव सर्वम बरोबर नियतीच्या लढाईत उतरलं आहे.एका चिमुकल्यावर दुर्धर आजाराने घाला घातला आणि त्याची निष्पाप लढाई सुरू झाली.
जीवनाचा आनंद घेण्याआधीच काळाची कराल पाऊले त्याच्या भोवती फिरू लागली. निरागस सर्वमच्या उपचारासाठी करोडो रुपयेचा पैसा लागणार आहे हे समजल्या नंतर त्याचे माता पिता घायाळ झाले. एका बाजूला अजानते कोवळे बालक आणि त्याची जगण्यासाठीची झुंज आणि दुसऱ्या बाजूला खर्चाचा महाकाय पर्वत अशी विपर्यस्त परिस्थिती निर्माण झाली. सर्वमचं आयुष्य अनिश्चित दोरीवर हिंदकळू लागलं.आई वडिलांची काळीज कातर झाली.एवढा मोठा खर्चाचा डोंगर कसा उचलायचा याची चिंता सतावू लागली.
बेळगाव हे संवेदनशील गाव आहे. कुणाच्या घराची भिंत कोसळली,तर बेळगावकरांचे खांदे तिथं दगड होऊन उभा रहातात. कुणाच्या घरातील धान्य संपले तर आपल्या ताटातील अर्धा वाटा त्या घरात जातो. कुणाच्या घरात अघटित घडलं तर बेळगावकर त्याच्या दारात हातचं काम टाकून उभा रहातो. बेळगाव हे संवेदनशील माणसांचे गाव आहे हे वारंवार सिद्ध झालं आहे ज्या हातांनी राष्ट्रीय आपत्तीत मदत दिली.ज्या हातांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 36 मण सिंहासनाच्या घडणीत चिमूटभर वाटा उचलला त्याच बेळगावकरानी सर्वमच्या वेदना आपल्या समजल्या आणि हजारो हात मदतीचा पसा घेऊन पुढे धावले.
याच पार्श्वभूमीवर वज्रनाद ढोल ताशा पथक या वर्षात जे वाजेल जे गाजेल तो पै न पैसा सर्वमच्या खर्चासाठी जाणार आहे. आता बेळगावकरनो ही टिपरी थांबली नाही पाहिजे. प्रत्येक कार्यक्रमात वज्रनाद वाजलापण पाहिजे आणि गाजलापण पाहिजे.हा सर्व पैसा सर्वमच्या उपचारासाठी पोहोचला पाहिजे.
वज्रनाद ढोल पथकाने आता आपले श्रम लावलेत, आम्ही आता मन लावूया.प्रत्येक कार्यक्रमात दररोज कुठं ना कुठं गरज असो वा नसो हे पथक वाजलच पाहिजे आणि सर्वम च्या मदतीसाठी मदतीचा ओघ असाच चालू राहिला पाहिजे