बेळगाव शहराचे फुप्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गरम्य व्हॅक्सिन डेपोला वाचविण्याचा लढा सध्या सुरू आहे. यासंदर्भातील पेंटिंग प्रदर्शनामध्ये व्हॅक्सिन डेपो समर्थकांच्या दोन गटांमध्ये मतभिन्नता होऊन जोरदार संघर्ष झाल्याची घटना आज सकाळी घडली.
टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये गुलमोहर बागतर्फे ‘ग्लीम्पस् ऑफ व्हॅक्सिन डेपो’ हे पेंटिंग प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी प्रदर्शनात पेंटिंग मांडणारे कलाकार आणि व्हॅक्सिन डेपो विकास समितीचे कार्यकर्ते यांच्यात विचार भिन्नतेमुळे वादाला तोंड फुटले. यावेळी व्हॅक्सिन डेपो विकास समितीच्या कार्यकर्त्यांनी पेंटिंग प्रदर्शन सुरू ठेवण्यास तीव्र विरोध केला.
परिणामी उभयतांमध्ये जोरदार बाचाबाची होऊन गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कलाकार मंडळी व्हॅक्सिन डेपोतील निसर्गाचे महत्व कळावे म्हणून आम्ही हे प्रिंटिंग प्रदर्शन भरविले आहे असे सांगून आपली बाजू मांडत होते.
त्याला प्रत्युत्तर देताना व्हॅक्सिन डेपोतील निसर्गाचा अनैतिक प्रकार करण्यासाठी वापर केला जात आहे त्याचे काय? असा सवाल उपस्थित करून कार्यकर्ते प्रदर्शनाला विरोध करताना दिसत होते.