कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी अनुदान आवश्यक असल्याने कोरोना नियंत्रणासाठीच सरकारने इंधन दरवाढ केली असल्याचे वादग्रस्त विधान अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी केली आहे.
शहरात काल बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारला अनुदानाची आवश्यकता होती. त्यासाठीच इंधन दरवाढ करण्यात आली आहे असे सांगून संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी अनुदान नको का? असा उलट प्रश्नही त्यांनी पत्रकारांसमोर उपस्थित केला.
कोरोनासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली दरवाढ तसेच केंद्र व राज्य सरकारांनी इंधनावर वाढविलेला कर यामुळे ही दरवाढ झाल्याचे मंत्री कत्ती यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्री उमेश कत्ती यांनी केलेल्या या खुलाशामुळे जनता इंधन दरवाढीमुळे मेटाकुटिला आलेली असताना सरकार इंधनावर कर वाढवत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांची नुकतीच बैठक झाली असून इंधन दरवाढ कशी कमी करता येईल याबाबत बैठकीत चर्चा झाली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर इंधनाचे दर कमी होतील, अशी आशाही मंत्री कत्ती यांनी व्यक्त केले आहे.