बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ क्रॉसनजीक अज्ञातांनी बियर बाटलीने हल्ला करून ठार केलेल्या तरुणाच्या खून प्रकरणाचे महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे लवकरच या खून प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता असून धाब्यावरील वादावादीतून हा खून झाल्याचा अंदाज आहे.
कल्लेहोळ क्रॉसजवळ गेल्या 14 ऑक्टोबर रोजी पहाटे रामचंद्र लक्ष्मण कणबरकर (वय 31, रा. उचगाव) हा तरुण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला आढळून आला होता. डोक्यात अज्ञातांनी बियर बाटलीने जबर मारल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या रामचंद्र याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
या प्रकरणी काकती पोलिसांनी आतापर्यंत बेळगाव शहरातील मुजावर गल्ली (श्री शिवाजी रोड), कोनवाळ गल्लीसह तालुक्यातील उचगाव, बेळगुंदी, कल्लेहोळ, हालगा आदी गावातील युवकांची चौकशी केली असून तपास चालू केलाय.
खुनाच्या आदल्या दिवशी (13 रोजी) रात्री रामचंद्र हा वेंगुर्ला रोडवरील एका धाब्यावर जेवणासाठी गेला होता. त्या ठिकाणी मित्रासोबत झालेल्या भांडण व वादावादीनंतर खुनाचा प्रकार घडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी धाब्यासह विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज वरून तपास कार्य हाती घेतले आहे.
मयत रामचंद्र यांच्या मोबाईलवरील कॉल डिटेल्स देखील तपासले जात आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका 20 -22 वर्षाच्या युवकाचा चेहरा स्पष्ट दिसत असून संबंधित युवक सध्या फरारी आहे. त्याला गजाआड केल्यानंतर या खुनाचे कोडे निश्चितपणे उलगडेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.