वृक्षप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने विरोध होत असताना देखील शहरात झाडांची कत्तल सुरूच आहे. नानावाडी येथे लोकांचा विरोध डावलून रस्त्या शेजारील एक मोठा वृक्ष आज तोडण्यात येत असून त्याला आक्षेप घेणाऱ्यांना पोलिसांची धमकी दिली जात असल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
स्मार्ट सिटीच्या विकासकामांच्या नांवाखाली यापूर्वीच शहरातील निम्म्याहून अधिक मोठे वृक्ष जमीनदोस्त करण्यात आले आहेत. शहरातील वृक्ष कमी पडल्याने आता संबंधित स्वार्थी मंडळींनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपला मोर्चा उपनगरातील झाडांकडे वळविला आहे. नानावाडी येथील मुख्य रस्त्याशेजारी असणाऱ्या एका वृक्षाची आज विरोध डावलून कत्तल करण्यात येत आहे. नीलगिरीचा पूर्ण वाढ झालेला हा वृक्ष अनेक वर्षापासून या ठिकाणी असून त्याचा वाहतुकीस अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव अडथळा होत नाही. तथापि मिळालेल्या माहितीनुसार तेथील एका प्रशस्त इमारतीचा दर्शनी भागासमोर हा वृक्ष येत असल्यामुळे तो तोडण्यात येत असल्याचे समजते.
गेल्या दोन दिवसापासून वृक्षप्रेमी सामाजिक कार्यकर्ते वरूण कारखानीस व त्यांचे सहकारी सदर वृक्षांची तोड होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
त्याचप्रमाणे दोन दिवसापूर्वी काही वकील, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी या झाडाच्या ठिकाणी भेट देऊन वृक्षतोडीला विरोध केला होता. तथापि कोणालाही दाद न देता संबंधित कंत्राटदाराकडून आज त्या वृक्षाची तोड केली जात आहे. सदर वृक्षतोडीचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करणाऱ्या वरूण कारखानीस यांना संबंधित कंत्राटदाराच्या माणसाकडून पोलिसांची धमकीही देण्यात आल्यामुळे नागरिकात सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
यापद्धतीने वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांना पोलिसांची धमकी दिली जात आहे याचा अर्थ नियोजनबद्धरीत्या सर्वांना हाताशी धरून संगनमताने ही वृक्ष तोड केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पर्यावरण संरक्षणासाठी अकारण होणारी वृक्षतोड थांबवावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.