टिळकवाडी पहिले रेल्वे गेट येथे गतिरोधक बसविण्यात बरोबरच रहदारी पोलिसाची नियुक्ती केली जाईल. तसेच जनावरे व पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी तेथील बॅरिकेड्स हटवून मार्ग खुला करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे.
माहिती अधिकाराखाली तपशील विचारल्यानंतर पोलीस आयुक्तांनी उपरोक्त माहिती दिली. टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट येथे बॅरिकेड्स लावल्याने स्थानिक नागरिकांना अडचणी येत आहेत. पलीकडे जाण्यासाठी सुमारे एक ते दीड किलोमीटर वळसा घालावा लागत आहे. त्याचप्रमाणे मंडोळी, चौगुलेवाडीच्या दिशेने आपली जनावरे चरावयास घेऊन जाणाऱ्या गवळी बांधवाना देखील बराच मनस्ताप सहन करावा लागतो. यासाठी संबंधित बॅरिकेड्स हटविण्याची मागणी गेल्या कित्येक महिन्यांपासून होत आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवासी सुभाष घोलप यांनी पोलीस आयुक्तांकडे बॅरिकेड्स बाबत माहिती अधिकाराखाली तपशील मागविला होता. त्याला आयुक्तांनी नुकतेच उत्तर पाठवले असून त्यात बॅरिकेड्स हटवण्याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही.
तथापि त्या ठिकाणी गतिरोधक बसवून वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली जाईल. पादचाऱ्यांना एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र या उत्तराने समाधान न झाल्यामुळे बॅरिकेड्स हटविण्यासाठी पुन्हा निवेदन देण्याचा निर्धार सुभाष घोलप यांनी केला आहे.