बेळगाव तालुक्यामधील रणकुंडये गावात दोन गटांमध्ये पेटलेल्या तुफान रणामध्ये दोन गटात हाणामारी होऊन चारजण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री ही घटना घडली असून गावात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेने बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरातही रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता.
गावात एका मंदिराच्या इमारतीवरून निर्माण झालेल्या वादात दोन गटांमध्ये दंगल उसळली. गावकरी मंदिराची पुनर्बांधणी करत होते. त्याला इनामदार कुटुंबातील काही सदस्यांनी विरोध केला.
मंदिराच्या जागेवरून पुढे इनामदार कुटुंबाने इमारत बांधण्यास विरोध केला. अशाप्रकारे, दोन गटाच्या सदस्यांत हातापायी झाल्याने चार जण जखमी झाले. अंजुम इनामदार, पाश्चबा इनामदार, उमर सौदागर, सय्यद इनामदार हे जखमी झाले आहेत.
जखमींवर सध्या बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. डीसीपी विक्रम आमटे आणि सीपीआय सुनील नंदेश्वर यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून तपास सुरू आहे.