रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि सरकारच्या मंत्र्यांनी स्पष्ट शब्दात स्पष्टीकरण देऊन देखील 10 रुपयांचे नाणे चलनात आल्यापासून बेळगावात ते स्वीकारले जात नसल्याचे दिसून येत आहे.
शहरात व्यवसायिक आस्थापने, लहान व्यापाऱ्यांसह खाजगी प्रवासी वाहन सेवा देणाऱ्यांकडूनही 10 रुपयांचे नाणे स्विकारण्यास नकार दिला जातो. खोट्या नाण्यांच्या अफवेमुळे रिझर्व बँक ऑफ इंडियाने परवानगी दिलेली असतानाही 10 रुपयांचे नाणे स्वीकारणे टाळले जात असल्याचे समजते.
बेंगलोर सारख्या शहरातील बहुतांश हॉटेल्स आणि इतर जागी आता 10 रुपये आणि 20 रुपयांची नाणी स्वीकारली जात आहेत. बेळगावात मात्र कोणीही ती स्वीकारत नाहीत. सदर नाण्यांच्या बाबतीत नागरिकांमध्ये असलेला गैरसमज आणि संभ्रम दूर करण्यात बँकांनाही यश आलेले नाही.
कर्नाटकातील बेळगाव सारख्या प्रमुख शहरात ही अवस्था असेल तर इतर लहान गावांमध्ये काय स्थिती असेल याचा विचार न केलेला बरा. व्यापाऱ्यांच्या त्रासात भर घालताना बँकांनी आता 10 रुपयांच्या नोटा देणे बंद केले आहे. आज एका व्यापाऱ्याने 6 बँका पालथ्या घातल्या परंतु प्रत्येक ठिकाणी त्याला ‘आमच्याकडे 10 रुपयांच्या नोटांचा स्टॉक नाही’ असे उत्तर ऐकायला मिळाले.
सदर बँकांकडे 10 रुपयांच्या नोटा नसल्यातरी नाणी मात्र उपलब्ध होती. परंतु ग्राहक ती स्वीकारतील की नाही या भीतीने तो व्यापारी ती नाणी घेण्यास धजावला नाही. तथापि सदर 10 रुपयांची नाणी ही वैध चलन मुद्रा असून व्यापाऱ्यांनी ती वापरात आणण्यास सुरुवात केली तरच चांगल्याप्रकारे चलनात येणार आहे हे देखील तितकेच खरे आहे.