येत्या 1 नोव्हेंबर काळ्या दिनी काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात तालुक्यातील गावागावांमध्ये जनजागृती करून विभागवार बैठका घेण्याद्वारे मोर्चा भव्य प्रमाणात यशस्वी करण्याचा निर्धार बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आज झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
रेल्वे ओव्हर ब्रिजनजीकच्या मराठा मंदिर सभागृहांमध्ये आज सायंकाळी बेळगाव तालुका म. ए. समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, सरचिटणीस एम. जी. पाटील, खजिनदार एस. एल. चौगुले, जि. पं. सदस्य सरस्वती पाटील आणि तालुका युवा समितीचे अध्यक्ष संतोष मंडलिक व्यासपीठावर उपस्थित होते. बैठकीत येत्या 1 नोव्हेंबर काळा दिनासंदर्भातील निषेध मोर्चा व त्या अनुषंगाने अन्य बाबींवर चर्चा करण्यात आली.
चर्चेअंती 1 नोव्हेंबरच्या मोर्चा संदर्भात बेळगाव तालुक्यातील गावोगावी जनजागृती करण्याचे तसेच त्यासाठी विभागवार बैठका घेण्याचे ठरले. कोणत्याही परिस्थितीत मोर्चा भव्य प्रमाणात पार पाडून मराठी द्वेष्ट्या कर्नाटक सरकारला मराठी भाषिकांची ताकद दाखवून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मोर्चा व्यतिरिक्त तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुनर्चनेबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थितांच्या सूचना व शंका जाणून घेण्यात आल्या. व्यासपीठावरील मान्यवरांनी कार्यकर्त्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच पुनर्रचनेसाठी इच्छुकांनी आपली नांवे येत्या 1 नोव्हेंबर पूर्वी द्यावीत, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
इच्छुकांची नावे आल्यानंतर पुनर्रचनेच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. बैठकीस बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अन्य पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.