कर्नाटक राज्य जलतरण संघटनेने बेंगलोर येथील विजयनगर ॲक्वेटिक सेंटर येथे नुकत्याच आयोजित केलेल्या 22 व्या कर्नाटक राज्यस्तरीय मास्टर्स अजिंक्यपद -2021 जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स क्लबने घवघवीत यश संपादन करताना पदकांची लयलूट केली.
शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी वयाची अट नसते याचे प्रतीक असणारी उपरोक्त राज्यस्तरीय स्पर्धा 25 ते 95 वर्षे वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी होती.
वयाचा प्रत्येकी पाच वर्षाचा कालावधी याप्रमाणे स्पर्धेचे गट करण्यात आले होते. सदर स्पर्धेत स्विमर्स क्लब बेळगावच्या जलतरणपटुंनी एकूण 27 पदके हस्तगत केली. त्यामध्ये 11 सुवर्ण, 11 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. स्विमर्स क्लबचे यशस्वी जलतरणपटू खालीलप्रमाणे आहेत.
जगदीश गस्ती (40 -44 वर्षे वयोगट) : तीन सुवर्ण, दोन रौप्य पदकं. कल्लाप्पा पाटील (55 -59 वयोगट) : तीन सुवर्ण, दोन रौप्य, एक कांस्य पदक. इंद्रजित हलगेकर (35 -39 वयोगट) : दोन सुवर्ण, दोन रौप्य, दोन कांस्य पदकं. लक्ष्मण कुंभार (70 -74 वयोगट) : दोन सुवर्ण, दोन रौप्य पदकं. बळवंत पत्तार (70 -74 वयोगट) : एक सुवर्ण, चार कांस्य पदकं. ज्योती कोरी (40 -44 वर्षे वयोगट) : दोन सुवर्ण, दोन रौप्य, दोन कांस्य पदकं. या सर्व जलतरणपटूंची आगामी अखिल भारतीय मास्टर्स जलतरण अजिंक्यपद स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे.
उपरोक्त सर्व जलतरणपटू केएलई सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात पोहण्याचा सराव करतात. त्यांना प्रशिक्षक उमेश कलघटगी, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर आणि आनंदेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. त्याचप्रमाणे या सर्वांना डाॅ. प्रभाकर कोरे, डाॅ. विवेक सावजी, रो. अविनाश पोतदार, माकी कपाडिया आणि लता कित्तूर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.