Saturday, January 11, 2025

/

*दसरा झाला हसरा*

 belgaum

*दसरा झाला हसरा*-ऑपरेशन मदत अंतर्गत जिव्हाळा फौंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.

डोंगर माथ्यावर वसलेला पंधरा एक घरांच्या वस्तीचा व जवळपास शंभर लोकसंख्येचा,चंदगड पासून जवळच दहा किलोमीटरवर निसर्गाच्या कुशीत वसलेला काजीर्णे धनगरवाडा.पण गावाला पक्का रस्ता नाही,शुद्ध पाण्याची सोय नाही.अशाही परिस्थितीत गावातील मुलं उन्हाळयात डोक्यावर उन्हाची कायली सोसत व पावसाळ्यात पायात चिखलवाट तुडवत आजही तब्बल 23 मुलं आणि मुली शाळा शिकून मोठे होण्याचे डोळ्यात स्वप्न पाहत रोज दहा किलोमीटरची पायपीट करीत आहेत.

या गावातील लोक आपला पारंपरिक गवळी व्यवसाय करीत असूनसुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी चाललेली पालकांची धडपड व या कोवळ्या मुलांची जिद्द पाहून स्वातंत्र्याच्या तब्बल 75 वर्षांनी नुकताच रयत फौंडेशनच्या अथक प्रयत्नाने गावासाठी एक सरकारी अंगणवाडी सुरू करण्यात आली. या अंगणवाडीच्या माध्यमातून आता येथील मुलांना लहानपणापासून शाळेची ओळख होण्यास मदत होणार आहे.त्याचबरोबर हीच अंगणवाडी आता गावातील मुलांसाठी अभ्यासाचे केंद्र बनले असून गावातील मुले रात्री अभ्यासासाठी नियमित उपस्थित असतात.
1ली ते 4 थी पर्यंतची पाच पासून आठ,नऊ वर्षाची मुले रोज पाच किलोमीटर जंगलातून वाट तुडवत बिजूर गावातील शाळेत जातात तर पाचवीपासूनची पुढील मुले दहा किलोमीटर चालत चंदगडला जातात.
शिक्षकांच्या अनुभवानुसार या वाड्यावरून येणारी मुले अभ्यासू असून वर्गात हुशार म्हणून गणली जातात.अशा या मुलांना प्रोत्साहन देण्याची गरज निर्माण झाली होती.

या मुलांची व्यथा या शाळेतील शिक्षक संजय साबळे यांनी सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील व कॅन्टोनमेंट मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे यांच्या कानावर घातली.
या मुलांना आपापल्या परीने शक्य ती मदत करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिव्हाळा फौंडेशनच्या वतीने जिल्हा पंचायत कार्यकारी अभियंता महांतेश हिरेमठ यांनी मुलांना प्रत्येकी अर्धा डझन वह्या,पेन,कंपास बॉक्स व इतर साहित्य उपलब्ध करून दिले तर राहुल पाटील यांनी या मुलांसाठी ग्रीन बोर्ड,खडू ,वोलीबॉल,फुटबॉल असे खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर लवकरच या सर्व मुलांची पायपीट थांबविण्यासाठी सायकलींची सोय करण्याचे काम चालू आहे. लवकरच फौंडेशनच्या वतीने मुलांना सायकली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. JIvhala

हा साहित्य वितरण कार्यक्रम धनगर वाड्यावर पार पडला.यावेळी जिव्हाळा फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सुरेखा पोटे,डॉ.राजश्री अनगोळ यांनी शिक्षण घेण्यासाठी मुलांची धडपड पाहून पालक,विद्यार्थी व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करून यापुढेही आवश्यक ती मदत देण्याचे सूतोवाच केले.
या वेळी डॉ.अनिल पोटे,मनाली पोटे,गीतांजली रेडेकर,संजय साबळे, राहुल पाटील,प्रशांत बिर्जे,शरद हदगल,गावातील शालेय विद्यार्थी व जगन्नाथ यमकर, देहू यमकर,बाबू पाटील,सिध्दू यमकर,लक्ष्मण कोकरे, जानू यमकर,प्रतिक्षा यमकर सह काजीर्णे ग्रामस्थ उपस्थित होते.या मदती बद्धल काजीर्णे ग्रामस्थांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

या विद्यार्थ्यांसाठी नव्या अथवा जुन्या सायकलींची आवश्यकता असून इच्छुक दानशूर व्यक्तींनी राहुल पाटील 9379116027, प्रशांत बिर्जे 9972944878 या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.