Thursday, December 19, 2024

/

9 महसूल निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस

 belgaum

ई -आस्थी योजना राबविण्यात हयगय केल्याप्रकरणी बेळगाव महापालिकेच्या 9 महसूल निरीक्षकांना महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच अकार्यक्षमतेबद्दल संपूर्ण महसूल विभागावर निलंबनाची कारवाई करण्याची शिफारस शासनाकडे केली जाईल, असा इशाराही दिला आहे.

महापालिकेमध्ये काल गुरुवारी घेतलेल्या महसूल विभागाच्या आढावा बैठकीमध्ये आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी संबंधित महसूल निरीक्षकांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला. महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर यांच्यासह संपूर्ण महसूल विभागच अकार्यक्षमत असल्याचा ठपका यावेळी आयुक्तांनी ठेवला.

महसूल उपायुक्त, महसूल अधिकारी यांच्यासह संपूर्ण महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची शिफारस शासनाकडे केली जाईल असा इशाराही आयुक्त डॉ. घाळी यांनी दिला. परिणामी बैठक संपल्यानंतर लगेच संबंधित 9 महसूल निरीक्षकांना नोटीस बजावण्यात आली.

बैठकीत आयुक्तांनी घरपट्टी वसुलीचा आढावा घेतला. ज्या महसूल निरीक्षक किंवा वॉर्ड क्लार्ककडून प्रत्येकी 2 हजार पेक्षा जास्त मिळकतींची घरपट्टी वसुली होणे बाकी आहे, त्यांनाही नोटीस बजावण्याचा आदेश आयुक्तांनी दिला. बैठकीत कायदा विभाग तसेच माहिती तंत्रज्ञान विभागाची झाडाझडती आयुक्तांनी घेतली. तांत्रिक माहिती देताना दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्यास घरी पाठविले जाईल, असे त्यांनी आयटी विभाग प्रमुखांना सांगितले. या विभागात सेवा बजावणारे कर्मचारी पात्र आहेत की नाहीत? याची खात्री करून घेण्याची सूचना त्यांनी दिली.

महसूल विभागाशी संबंधित न्यायालय दावे, विविध फाइल्स याबाबत नियमित पाठपुरावा करण्याचा आदेश त्यांनी कायदा सल्लागार ॲड. यु. डी. महांतशेट्टी यांना दिला. कायदा विभागाबाबत यापुढे कोणतीही तक्रार येता कामा नये अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली. बेळगाव महापालिकेत सर्वाधिक तक्रारी महसूल विभागाच्या विरोधात असल्याचे यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले. यासाठी महसूल उपायुक्तांपासून सर्वांना त्यांनी यासाठी जबाबदार धरले. ई -आस्थी योजना 100 टक्के यशस्वी करण्याचा आदेश नगरविकास खात्याने दिला आहे.

खातेबदल, पीआयडी देण्याचे काम ई -आस्थीच्या माध्यमातून झाले पाहिजे असा आदेश असताना महसूल विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच आयुक्तांनी सर्व म्हणजे 9 महसूल निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.