शिवाजीनगरला दरवर्षी भेडसावणारी पुराची समस्या निकालात काढण्यासाठी पावसाळ्यात अशोकनगर कडील नाल्यातून मोठ्या प्रमाणात शिवाजीनगर नाल्याला मिळणारे पाणी मधोमध भींत बांधून परस्पर महांतेशनगर कॉर्नर येथील ब्रिजच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या नाल्यात सोडण्यात यावे, अशी जोरदार मागणी शिवाजीनगर येथील नागरिकांकडून केली जात आहे.
दरवर्षी जोराचा पाऊस झाल्यास शहरातील शिवाजीनगर भागात पूर परिस्थिती निर्माण होते. या ठिकाणच्या बहुतांश गल्ल्यांमध्ये घराघरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. अशोकनगर नाल्यातून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे हा प्रकार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अशोक नगरकडून येणाऱ्या नाल्याचे पाणी किल्ला तलावानजीक महांतेशनगर कॉर्नरला असणार्या ब्रिजच्या ठिकाणी मोठ्या नाल्यात सोडण्यात येते. याच नाल्याच्या ठिकाणी शिवाजीनगरातील नाल्याचे पाणी जाऊन मिळते. जोरदार मुसळधार पाऊस झाल्यास शिवबसवनगर, गॅंगवाडी, वीरभद्रनगर, सुभाषनगर या भागातून मोठ्या प्रमाणात येणारे पावसाचे पाणी अशोकनगर नाल्याद्वारे शिवाजीनगर नाल्याला येऊन मिळते. तथापि अशोकनगर येथून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण 80 टक्के आणि शिवाजीनगर येथून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण 20 टक्के असते. या पद्धतीने शिवाजीनगर नाल्यातील पाण्याचा दाब कमी असल्यामुळे अशोकनगर नाल्यातील प्रचंड दाबाचे सर्व पाणी शिवाजीनगरमध्ये वर चढते. परिणामी पावसाळ्यात शिवाजीनगर येथील पहिली गल्ली, पहिला क्रॉस, दुसरा क्रॉस, सातवा क्रॉस, पंजिबाबा मठ पाचवी गल्ली लास्ट क्रॉस आदी सर्व ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊन घराघरात पाणी घुसते.
दरवर्षी शिवाजीनगर येथील पूर परिस्थिती निकालात काढण्यासाठी योजना आखण्याचे उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र प्रत्यक्षात ठोस असे कांहीच केले जात नाही. त्यासाठी शिवाजीनगरवासियांनी पुढाकार घेऊन उपाय सुचवला आहे. अशोकनगर नाल्याचे पाणी शिवाजीनगर नाल्यातील पाण्यात मिसळणार नाही याची खबरदारी घेऊन त्या नाल्यातील पाण्यासाठी वेगळी स्वतंत्र वाट करून द्यावी.
त्यासाठी आवश्यकता भासल्यास ज्या ठिकाणी दोन्ही नाल्यांचे पाणी एकमेकांना मिळते त्या ठिकाणी मधोमध भक्कम भिंत बांधावी, जेणेकरून शिवाजीनगर नाल्याचे पाणी पुढे जाऊन ब्रिज नजीकच्या मोठ्या नाल्याला जाऊन मिळावे. या पद्धतीने कार्यवाही झाल्यास शिवाजीनगरला दरवर्षी भेडसावणारी पुराची समस्या निकालात निघू शकेल. तेंव्हा लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची नोंद घेऊन पावसाळ्यात अशोकनगर कडील नाल्यातून मोठ्या प्रमाणात शिवाजीनगर नाल्याला मिळणारे पाणी मधोमध भींत बांधून परस्पर मोठ्या नाल्यात सोडावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.